मुंबई : सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होणार असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 2 हजार 869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. तब्बल ९ वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना अशा 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे.
निवडणुकीसाठी 15 हजार 908 उमेदवार रिंगणात असून, मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तेथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे.
किती महापालिकांमध्ये महायुती आहे?
राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे; तर शिवसेना-भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे. उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
महापालिकेच्या निमित्ताने ठाकरे- पवार कुटुंब एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये एकत्र आले आहेत; तर पंचवीस वर्षांपूर्वी वेगळे झालेले उद्धव आणि राज ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही मुंबईत पहिल्यांदाच आघाडी झाली आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत एकूण किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार?
निवडणूक आयोगाने एकूण 3 कोटी 48 लाख 39 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. तसेच, पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील.
काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: 4 मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.
मतदानासाठी आज सुट्टी
महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे व नागरिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी मतदान होणार्या महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व खासगी आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पुरावे ग्राह्य धरले जातील?
भारताचा पासपोर्ट
आधार ओळखपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र
राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड
निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी
लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधान परिषद/ सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्या मतदान यंत्राची मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे एक सदस्यीय पद्धत असलेल्या मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरलेली भारत निवडणूक आयोगाची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. तर इतर २८ महापालिकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या यंत्रांचा वापर केला जाणार आहे.