Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक आजच्या दिवसाकडे डोळे लावून बसले होते. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल आज दुपारी ११.३० वाजता ऑनलाइन जाहीर झाला आहे. सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.
यंदा राज्यातील तब्बल २३ हजार ६८३ शाळांमधून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे राज्यभरात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र दरवर्षी निकालाच्या वेळी वेबसाइटवर ताण वाढल्यामुळे साइट स्लो होणे किंवा क्रॅश होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी डिजीलॉकर आणि एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेबसाइट सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number असा मेसेज टाईप करायचा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवायचा. काही क्षणांत विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर निकालाची माहिती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवरून डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी प्रथम digilocker.gov.in या संकेतस्थळावर किंवा DigiLocker App वर लॉगिन करावे लागेल. अकाउंट नसल्यास आधार क्रमांकाच्या मदतीने नवीन खाते तयार करता येईल. त्यानंतर ‘Education’ विभागात जाऊन ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’ हा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर ‘Class X Marksheet’ किंवा ‘SSC Result 2026’ या लिंकवर क्लिक करून सीट नंबर आणि आईचे नाव टाकायचे. ‘Get Document’ वर क्लिक करताच विद्यार्थ्यांची डिजिटल मार्कशीट स्क्रीनवर दिसेल. ही मार्कशीट डाउनलोड करून सेव्हही करता येणार आहे.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
राज्यात दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला
यंदा सुद्धा दहावीच्या बोर्डात मुलींची बाजी
मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी
कोकण: ९७.६२ टक्के
पुणे: ९४.२४ टक्के
नागपूर: ८९.०७ टक्के
मुंबई: ९४.९७ टक्के
कोल्हापूर: ९५.४७ टक्के
अमरावती: ९०.५० टक्के
नाशिक: ९०.५३ टक्के
लातूर: ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के
एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६
उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६
अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास ताण येतो. मात्र बोर्डाने अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करता येणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेची कॉपी मागवण्याचीही सुविधा दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आपला पेपर पुन्हा तपासला जावा असे वाटत असेल, त्यांनाही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी, रीचेकिंग आणि उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
निकाल हा आयुष्याचा शेवट नसतो, तर पुढच्या टप्प्याची सुरुवात असते. चांगले गुण मिळाले तर आनंद साजरा करा; आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तरी खचून जाऊ नका. पुढे अनेक संधी उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी शांत राहून पुढील शिक्षणासाठी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.