कोल्हापूर; विकास कांबळे : संचमान्यतेसाठी सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये आधार क्रमांकाची नोंद बंधनकारक करण्यात आल्याने या नोंदीमध्ये विद्यार्थ्यांची दुबार नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या तपासणीच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी गटविकास अधिकार्यांना दिल्या आहेत. दुबार विद्यार्थ्यांच्या नावाची तपासणी करून दि. 17 नोव्हेंबरपर्यंत माहिती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुबार नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6,300 आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर या बोगस विद्यार्थ्यांच्या नावांचा शोध घेऊन नावे कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार नोंद झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये स्टुडंट पोर्टलमध्ये एकाच नावाचे विद्यार्थी एकाच शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गात अथवा वेगवेगळ्या शाळांमध्ये नोंद झाल्याचे दिसून येत आहे. याची स्थानिक यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन पडताळणी करावी आणि ज्या शाळेतील वर्गामध्ये विद्यार्थ्याची दुबार नोंद झाली आहे ती नोंद जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्याच्या सूचनाही उबाळे यांनी दिल्या आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनीही तशा सूचना माध्यमिक शाळांना दिल्या आहेत. वेळेत अहवाल सादर न करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारीउबाळे यांनी सांगितले.
दुबार नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय संख्या
पहिली (9), दुसरी (188), तिसरी (420), चौथी (522), पाचवी (397), सहावी (369), सातवी (543), आठवी (507), नववी (675), दहावी (758), अकरावी (283) आणि बारावी (1,629).
सर्वाधिक दुबार खासगी अनुदानित शाळांमध्ये
दुबार किंवा दोन शाळांमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील संख्या 6 हजार 300 इतकी आहे. त्यापैकी 4 हजार 1 विद्यार्थी हे खासगी अनुदानित शाळांमधील असल्याने पुन्हा एका अनुदानित शाळांमधील कारभार चर्चेत आला आहे. अशंत: अनुदानित शाळांमध्ये 155 विद्यार्थ्यांची दुबार नोंद आढळून आली आहे.
जिल्हा परिषद शाळाही अपवाद नाहीत
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येदेखील दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे आढळून आले आहे. त्याची संख्या 804 इतकी आहे.