कोल्हापूर

हातकणंगले : डंपरची दुचाकीला धडक : महिला ठार

Arun Patil

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : भरधाव डंपर आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात पूजा सुरेश पाटील (वय 32, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) या महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी डंपर चालक विकास पारसे (रा. इचलकरंजी) याला डंपरसह ताब्यात घेतले आहे.

तारदाळ येथील सुरेश पाटील मोटारसायकलवरून कुलदैवत धुळोबा देवालय येथे निघाले होते. हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यानजीकच्या ओढ्याजवळ मागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत पाटील दाम्पत्य, मुलगा आर्यन आणि भाचा विराज रस्त्यावर आपटले. पूजा यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे वाहनातून नेत असतानाच वाटेतच रुग्णवाहिका आली. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिकेतून जखमींना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच पूजा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

भरधाव वाहतुकीला आळा घालण्याची गरज

हातकणंगले, तारदाळ, खोतवाडी रोडवर भरधाव मुरुमाने भरलेले डंपर प्रचंड वेगाने धावत असतात. अनेकवेळा या परिसरात अपघात झाले आहेत. तरीही डंपर चालक मुरुमाच्या नावाखाली सुसाट धावत असतात. त्यांच्यावर अंकुश नसल्याने अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागला आहे. पण तरीही डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतात. त्यामुळे सामान्य नागरिक, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याची दखल गांभीर्याने पोलिस खात्याने घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. घटनास्थळाला लागूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात विक्रेते बसतात. त्यांनाही पायबंद घालण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT