कोल्हापूर

हद्दवाढ बाबत दिवाळीनंतर बैठक : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुंबईत दिवाळीनंतर बैठक घेऊ, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले. मंगरायाची वाडी (ता. हातकणंगले) येथे मोहिते फार्म हाऊसवर शिष्टमंडळाने ना. शिंदे यांची भेट घेतली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला होता. पण अंतिम क्षणी यावर शिक्कामोर्तब झाले नाही. हद्दवाढीअभावी शहराचा विकास खुंटला आहे. दहा लाखांच्यावर लोकसंख्या नसल्याने केंद्र सरकारचा फारसा विकास निधी मिळत नाही. राज्य शासनाकडूनही मोजकाच निधी मिळतो. शहर विस्तारालाही आता फार मर्यादा आल्या आहेत. यावर हद्दवाढ करणे हा एकमेव पर्याय आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

आ. चंद्रकांत जाधव यांनीही रोजगार वाढीला चालना देण्यासाठी हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगितले. दरवर्षीच्या महापुराने शहराची स्थिती बिकट बनली आहे. आता नव्या वसाहती तयार करण्यासाठी हद्दवाढीशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, शहर हद्दवाढीचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता नवीन प्रभाग रचनेनुसार 92 नगरसेवक होणार आहेत. एवढ्या सदस्यांना बसायला सभागृहात जागाही उपलब्ध नाही. यापूर्वी शासनाकडून सकारात्मक पावले उचलली गेली होती. पण प्रत्यक्षात हद्दवाढ झाली नाही. शहराची घुसमट होत चालली आहे. त्यामुळे हद्दवाढीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, यापूर्वीही महापालिकेकडून राज्य शासनाला हद्दवाढीसंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. पूर्वी 18 गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. नंतर नव्या प्रस्तावात 42 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दोन औद्योगिक वसाहतींचाही समावेश आहे. शासनाने या प्रस्तावाचा विचार करावा.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर यापूर्वी चर्चा झाली आहे. तेव्हा काही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगण्यात आले होते. दिवाळीनंतर मुंबईत मंत्रालयात या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

या बैठकीला माजी आमदार सुरेश साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, कुलदीप गायकवाड, सुभाष देसाई, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रस, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT