file photo 
कोल्हापूर

हत्तीमुळे होणार्‍या मालमत्ता नुकसानीचीही भरपाई मिळणार

Arun Patil

कोल्हापूर : अनिल देशमुख : वन्य हत्तीमुळे होणार्‍या मालमत्तेचीही यापुढे नुकसानभरपाई मिळणार आहे. राज्य शासनाने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात वन्य हत्ती नाहीत. मात्र, शेजारील राज्यातून असे हत्ती येत आहेत. कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध— प्रदेश राज्यांच्या सीमेवरील महाराष्ट्राच्या जिल्ह्यात अशा हत्तींचा वावर वाढला आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवरील कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतातील उभी पिके या हत्तींकडून नष्ट केली जात आहेत.

हत्तींमुळे होणार्‍या पिकांच्या नुकसानीची भरपाई राज्य शासनाकडून देण्यात येते. यासह जीवित हानी झाली तर त्याचीही भरपाई मिळते. मात्र,गेल्या काही महिन्यांपासून या हत्तींकडून शेती अवजारांसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याच्या भरपाईची तरतूद नव्हती. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले होते. आता मात्र, अशा नुकसानीचीही भरपाई मिळणार आहे.

राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार शेती अवजारे व उपकरणे, बैलगाडी, संरक्षक भिंत, कुंपण यांच्यासह कौलारू, पत्र्यांचे घर, जनावरांचा गोठा, स्लॅबची इमारत आदींच्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद केली आहे. याची अंमलबजावणीही आजपासूनच लागू होईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

अशी असेल प्रक्रिया

घटना घडल्यापासून तीन दिवसांत संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागेल. नुकसान झालेले साहित्य, वस्तू पंचनामा होईपर्यंत जागेवर तशाच ठेवाव्यात. वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभिंयता आणि तलाठी या त्रिसदस्यीय समितीकडून 14 दिवसांत पंचनामा होईल. त्यानंतर अहवाल सादर होईल. अहवालानंतर चार दिवसांत अथवा घटना घडल्यापासून एकूण 23 दिवसांत आर्थिक मदतीचा धनादेश संबंधिताला दिला जाईल. अतिक्रमणधारकाचे त्या जागेवरील नुकसान झाल्यास, त्याच्याविरोधात वन अधिनियम, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला असल्यास मात्र, भरपाई मिळणार नाही.

अशी आहे भरपाई

शेती अवजारे, उपकरणे- नुकसानीची रक्कम अथवा जास्तीत जास्त 5 हजार

बैलगाडी-नुकसानीची रक्कम अथवा जास्तीत जास्त 5 हजार

संरक्षक भिंत, कुंपण- नुकसानीची रक्कम अथवा जास्तीत जास्त 10 हजार

कौलारू घर, गोठा- नुकसानीची रक्कम अथवा जास्तीत जास्त 50 हजार

विटा, स्लॅबची इमारत-नुकसानीची रक्कम अथवा जास्तीत जास्त 1 लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT