कोल्हापूर

सिनेमासाठी सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची गरज : मिथुनचंद्र चौधरी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दीर्घकाळ टिकणारा सिनेमा बनवायचा असेल तर समाजातील प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची द़ृष्टी व संवेदनशील मन जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम विभागाचे प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनामधील डॉक्युमेंट्री फोटोग्राफी आणि शॉर्ट फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. फिल्मफेअर पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव प्रमुख उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, चांगल्या आशयाचा सिनेमा दीर्घकालीन टिकतो व समाजामध्ये आपोआपच रुजतो. आपल्या अंगी संवेदनशील मन असेल तरच संवेदनशील सिनेमाची निर्मिती होऊ शकते. सिनेमाच्या निर्मितीकडे वळण्यासाठी वाचन, संशोधन, नृत्य, नाटक, कला, संगीत आदींचे ज्ञान मिळवणे, कॅमेरा हाताळण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे.

सचिन सूर्यवंशी म्हणाले, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्राचे अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे. खडतर परिस्थितीवर मात करून ज्ञानाच्या जोरावर यश मिळवावे.

याप्रसंगी चौधरी यांची निर्मिती असलेला 'पायवाट' हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपट दाखवण्यात आला. यावेळी पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, चित्रपट अभ्यासक डॉ. अनमोल कोठाडिया, स्टोरी बोर्ड रायटर स्वप्नील पाटील, अभिजित गुजर, आर.जे. पूजा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पुष्पा पाटील यांनी केले. आकाश कुलकर्णी यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT