कागल; पुढारी वृत्तसेवा : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, पुणे या संस्थेने 'साखर उद्योग गौरव' पुरस्कार जाहीर केला होता. कर्नाटकचे मंत्री मृगेश निराणी यांच्या हस्ते घाटगे यांनी तो सन्मानपूर्वक स्वीकारला.
यावेळी व्यासपीठावर साखर आयुक्त शेखर गायकवाड, एस. एस. इंजिनिअरचे शहाजी भड, सोहन शिरगावकर, प्रकाश नाईकनवरे, एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल, आरती देशपांडे आदी उपस्थित होते. गेस्ट ऑफ ऑनर म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून घाटगे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
सहकारी साखर कारखानदारीमध्ये आदर्श ठरलेल्या व स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या येथील शाहू कारखान्याला आजपर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील 64 पुरस्कार मिळालेले आहेत. समरजितसिंह घाटगे यांनी यामध्ये सातत्य राखत जवळपास नऊ पुरस्कार मिळवले आहेत. शाहू कारखान्यास नुकताच राष्ट्रीय साखर महासंघाकडून गत हंगाम 2020-21 करिता उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेच्या स्टेजवरून शाहू कारखान्यानेअनेक पुरस्कार स्वीकारलेले आहेत. काही पुरस्कार स्वीकारताना माझे वडील स्व.विक्रमसिंह घाटगे यांच्याबरोबर होतो. त्यांची आवर्जून आठवण झाली. वैयक्तिक स्वरूपाचा पुरस्कार मला मिळाला, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. याचे सर्व श्रेय माझे वडील स्व.राजे व कारखान्यांचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांना देतो. सभासदांचे सहकार्य आणि वडिलांची शिकवण यामुळेच हे शक्य झाले.