कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळावी, या संभाजीराजे यांच्या प्रस्तावाला शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजीराजेंची कोंडी झाली आहे. संभाजीराजे यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी घ्यावी, यावर शिवसेना ठाम आहे.
केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर 2016 मध्ये संभाजीराजेंना राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभा सदस्यत्व मिळाले. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने त्यांनी किल्ले रायगड संवर्धन कामाला चालना दिली. मराठा आरक्षण आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केले.
राज्यसभा सदस्यत्वाची त्यांची मुदत नुकतीच संपली. विधानसभेतून राज्यसभेवर सहा खासदारांची निवड होणार आहे. प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार खासदार निवडले जातात. विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी 10 मे रोजी भेट घेतली होती. राज्यसभेवर नियुक्ती केल्याबद्दल आभार मानण्यासाठी आपण ही भेट घेतली, असा खुलासा त्यांनी केला होता. मात्र, ते पुन्हा भाजपबरोबर जाणार काय, याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले होते.
संभाजीराजे यांनी विधानसभेतून राज्यसभेवर जाण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न चालवले होते. त्यातच कोणत्याही पक्षात सहभागी न होता स्वतंत्र 'स्वराज्य' संघटना स्थापन केल्याची घोषणा त्यांनी 12 मे रोजी केली होती. आपण अपक्ष लढणार, असे त्यांनी जाहीर केले होते. उरण मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर यांचा पराभव करणारे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांची त्यांनी सूचक म्हणून सहीही घेतली. बालदी हे भाजपचे निकटवर्ती आहेत.
पवारांचे वक्तव्य
संभाजीराजे यांची अशी तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 16 मे रोजी नांदेड येथे संभाजीराजे यांना अनुकूल स्वरूपाचे वक्तव्य केले. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येक पक्षाची एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकते. याव्यतिरिक्त शिल्लक मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजे यांना देऊ, त्यासाठी चर्चा करू, असे वक्तव्य पवार यांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजे यांच्या हालचालींना वेग आला. मात्र, पुढील घडामोडीत शिवसेनेने संभाजीराजे यांनी शिवबंधन स्वीकारण्याची भूमिका घेतली, तर पवारांनी मूळ वक्तव्याला बगल दिली.
आपल्याला अपक्ष उमेदवारीसाठी सर्वच पक्षांनी मतदान करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी 17 मे रोजी केले होते. 'वर्षा'वर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 19 मे रोजी भेट घेतली आणि त्यांच्यापुढे आपला प्रस्ताव मांडला; पण उद्धव यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी, अशी भूमिका घेतली. पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी तीच भूमिका पुन्हा मांडली.
पवारांच्या भूमिकेने अडचण
मागील वेळी शिवसेनेचे आमच्या उमेदवाराला मते दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी यावेळी शिवसेना उमेदवाराला मतदान करील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली होती. शरद पवार यांनी त्याचा पुनरुच्चार केला. पुणे येथे 21 रोजी बोलताना शरद पवार यांनी शिवसेना जो उमेदवार देईल, त्याला आपला पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले. उद्धव यांची शिवसेनेची उमेदवारी घ्यावी ही भूमिका आणि शरद पवार यांचे स्पष्टीकरण यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याबाबत संभाजीराजेंची कोंडी झाली.
संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता संभाजीराजे यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, ते त्यांना न भेटताच पुण्याला परतले. त्यामुळे सोमवारीही यावर काही मार्ग न निघाल्याने ही कोंडी कायम राहिली आहे. संभाजीराजे आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.