कोल्हापूर

संघटित टोळ्या, तस्कर, फाळकूटदादांवर कारवाईचा बडगा : पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  संघटित गुन्हेगारी टोळ्या, काळेधंदेवाल्यांसह तस्कर आणि गुंडागर्दी करून दहशत माजविणार्‍या समाजकंटकांविरुद्ध कोल्हापूर पोलिस दलाने 2022 मध्ये कारवाईची प्रभावी मात्रा लागू केल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी सांगितले. फिर्यादी, पंचांच्या फितुरीमुळे दोषसिद्धीचे प्रमाण घटत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संघटित टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी 2022 मध्ये 14 गुंडांविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करून सराईतांना अटक करण्यात आली आहे. झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारत दोन म्होरक्यांना वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर 3 टोळ्यांतील 31 समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महिला अत्याचारांसह गंभीर गुन्ह्यांत वाढ

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये घरफोडी, चोरीसह महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांचा आलेख वाढल्याचे दिसून येतो. 2021 मधील आकडेवारी कंसात : खून 51 (50), घरफोडी 460 (318), चोरी 401 (277), दुचाकी चोरी 833 (695), ठकबाजी 321 (197), बलात्कार 197 (178), विनयभंग 366 (349), प्राणघातक अपघात 423 (388), दुखापत 1031 (934), जुगार 1120 (10) गुन्ह्यांचा समावेश आहे.

4 हजार 235 रोडरोमिओंवर बडगा

महिला, युवतींची छेडछाड करून शारीरिक, मानसिक त्रास देणार्‍या समाजकंटकांविरुद्ध निर्भया पथकामार्फत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 4 हजार 235 रोडरोमिओंवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. भरोसा सेलमार्फत 143 प्रकरणांत समझोता घडविण्यात आला आहे.

41 गुटखा तस्करांना बेड्या

काळेधंदेवाल्यांविरुद्ध जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. 1120 ठिकाणी छापे टाकून 3 कोटी 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 41 गुटखा तस्करांना बेड्या ठोकून 1 कोटी 44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ कायद्यान्वये 37 गुन्हे दाखल करून 73 तस्करांना जेरबंद करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पोलिस ठाण्याचे विभाजन करून मजरे कार्वे येथे नवीन पोलिस ठाण्याचा अंतर्भाव आहे. राजारामपुरी, जुना राजवाडा, करवीर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून सुभाषनगर येथे नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे सादर करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT