कोल्हापूर

‘श्रीराम’च्या सभासदांचा सतेज पाटील यांच्यावरच विश्‍वास

Arun Patil

कसबा बावडा ; पवन मोहिते : गत 17 वर्षे श्रीराम सेवा संस्थेत पारदर्शी आणि प्रगतीचा कारभार केल्यामुळेच पुन्हा एकदा सभासदांनी मंत्री सतेज पाटील यांच्यावर द‍ृढ विश्‍वास दाखवत त्यांच्या गटाकडे सत्ता कायम ठेवली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचा मंत्री पाटील यांनी दिलेला प्रस्ताव विरोधकांनी एकमताने नाकारल्यामुळे निवडणूक लागली. निवडणूक बिनविरोध झाली असती, तर संस्थेचे लाखो रुपये वाचले असते.

21 मार्च 1929 रोजी सीताराम मैंदर्गीकर यांच्यासह दिनकर पाटील, निवृत्ती चव्हाण, केशवराव रणदिवे आदी 7-8 जणांनी सावकारीच्या पाशातून शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने श्रीराम मंदिरात संस्थेची स्थापना केली. या काळात डॉ. डी. वाय. पाटील, धोंडिराम रेडेकर, शामराव पाटील, हिंदुराव ठाणेकर, बापूसो लाड यांच्यासह अनेकांनी संस्थेचे संचालक आणि सभापतिपद भूषवले आणि लौकिकास साजेसा कारभार केला.

1976 पासून मात्र संस्थेत सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. आर. एन. चौगले, भगवान पाटील, विश्‍वास नेजदार, जयवंत पाटील, प्रतापराव चव्हाण आदींनी 'श्रीराम पॅनेल' तर हिंदुराव ठाणेकर आदींनी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. यामध्ये श्रीराम पॅनेलला बहुमत मिळाले.

1977 च्या निवडणुकीमध्येही श्रीराम पॅनेलकडे सत्ता कायम राहिली. 1979 मध्ये श्रीराम सेवा संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. सभापतिपदी शशिकांत पाटील होते. या कार्यक्रमास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, सहकार मंत्री एन. डी. पाटील, कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली होती. 1983 व 1986 मध्ये पुन्हा श्रीराम पॅनेल सत्तेत आले. 1989 मध्ये छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक झाली. यामध्ये विश्वास नेजदार, हिंदुराव ठाणेकर, नामदेव बिरंजे यांची कसबा बावड्यातून बिनविरोध निवड झाली. यानंतर कसबा बावड्यातील राजकीय समीकरणे बदलली. 1989 च्या निवडणुकीत सहकार पॅनेलने 9-2 अशी बाजी मारली.

1995 च्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक संख्या 13 झाली. याहीवेळी नेजदार गटाच्या श्रीराम पॅनेलने बाजी मारली. 2000 च्या निवडणुकीत पुन्हा याच गटाकडे सत्ता कायम राहिली. या पंचवार्षिक पासून संस्थेला उतरती कळा लागली. कर्जाची वसुली वेळेत झाली नाही. कारभार व्यावसायिक पद्धतीने न केल्यामुळे अनेक विभाग बंद पडले.

2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले. दरम्यान, संस्थेची अधोगती पाहून सतेज पाटील यांनी कारभारात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. 2005 निवडणुकीत सर्वसहमतीने निवडणूक बिनविरोध करण्याचा पाटील यांचा प्रस्ताव सत्ताधार्‍यांनी मान्य न केल्यामुळे निवडणूक झाली आणि संस्थेत सत्तांतर झाले.

सतेज पाटील यांनी आणली ऊर्जीतावस्था

सत्तांतर झाल्यानंतर सतेज पाटील यांनी पूर्वी बंद झालेल्या शाखा सुरू करणे, सुरू असलेल्या आणि मरगळ आलेल्या शाखांचे सक्षमीकरण करणे यावर भर दिला. दि. 16 नोव्हेंबर 2006 रोजी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने संस्थेचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. गेली सतरा वर्षे संस्थेचा कारभार पारदर्शी आणि सभासदाभिमुख राहिला आहे. आजही संस्थेमध्ये सहकारातील आदर्श संस्था म्हणून अनेक व्यक्ती, अभ्यासक भेट देत असतात आणि संस्थेच्या कारभाराची माहिती घेत असतात.

सुसज्ज मंगल कार्यालय, समोर संपूर्ण परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संस्थेची रंगरंगोटी करणे यासाठी डॉ. संजय पाटील यांनी पुढाकार घेत हा सर्व भार उचलला आहे. यंदाही निवडणूक बिनविरोध करू यासाठी स्वतः मंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना प्रस्ताव दिला होता; पण विरोधकांत एकमत न झाल्याने निवडणूक लागली. सत्ताधारी श्रीराम सेवा पॅनेलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत दोन हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना सभासदांनी चोख उत्तर दिले.

संस्थेचे कोल्ड स्टोरेज उभारणे, सामुदायिक शेतीला चालना देणे, ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे, सीएनजी गॅस पंप उभारणे यासह शेतकरी आणि सभासदाभिमुख उपक्रम राबवण्याचा मानस मंत्री सतेज पाटील यांनी सभासदांना साद घालताना व्यक्‍त केला आहे. संस्थेच्या सभासदांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास दाखवत संस्थेची धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT