निगवे खालसा : पुढारी वृत्तसेवा
नावात 'श्रीमंत' असणार्या कंपनीने लोकांच्या गुंतवणुकीचा बाजार करत लाखो रुपयांचा परतावा लांबवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. मोठ्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
रक्कम भरल्यानंतर परताव्याची रक्कम फक्त 75 दिवसांत मिळणार, 34 हजाराला 75 दिवसात 54 हजार मिळणार, 1 लाख रुपयाला 1 लाख 60 हजार, 2 लाखाला 3 लाख 20 हजार रुपये प्रमाणे रक्कम त्या पटीत मिळत जाणार. या कमी कष्टात जादा रक्कम मिळते या भाबड्या आशेपोटी गुंतवणूकदारांनी 34 हजारपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवली आहे. पण परताव्याची रक्कम सुरुवातीला 75 दिवसांत मिळणार नंतर 90 दिवसांत मिळणार म्हणत असताना 5 महिने झाले तरी रक्कम लोकांना मिळालेली नाही.
कमी दिवसात, कमी कष्टात जादा पैसे मिळणार या आमिषापोटी एजंटाच्या नादाला लागून त्यांच्या गोड बोलण्याला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामध्ये शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलिस, महावितरणचे कर्मचारी, किराणा दुकानदारा पासुन सर्वच स्तरातील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये करवीर, कोल्हापूर शहर, गारगोटी, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड आदी भागातील नागरिकांनी एजंटांच्या घराकडे चकरा मारून त्यांचे उंबरे झिजवले आहेत. आता काही गुंतवणूकदार पोलिसात तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.