कोल्हापूर : डी. बी. चव्हाण कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डातील विविध विभागांत पडलेल्या शेतीमालाच्या खराब कचर्यातून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या आठ बेडचा हा प्रकल्प असून त्यातून गांडूळ खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यातील एका बेडमधून 2 हजार किलो म्हणजे आठ बेडमधून दोन महिन्यांतून एकवेळ 16 हजार किलो गांडूळ खत उत्पादन होणार आहे.
बाजार समितीत फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा या विभागांतून दररोज तीन ते साडेतीन टन ओला-सुका कचरा मिळतो. या कचर्यात फक्त भाजीपालाचे वेस्टेज असते. कुजण्याची प्रक्रिया लवकर होणार, असा हा कचरा असतो. दररोज या कचर्याची उचल केली जाते. हा कचरा समितीच्या आवारातच एका ठिकाणी टाकला जातो, पण वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी हा कचरा टाकल्याने तेथे मोठा ढीग तयार झाला आहे. या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झाली होती. मार्केट यार्डातील प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रशासक मंडळाने गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
समितीच्या आवारातील जनावरांचा बाजार परिसरात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी 20 बाय 5 फूट आकाराचे आठ बेड तयार करण्यात आले आहेत. त्यावर 10 बाय 4 मीटर आकाराचे शेड-नेटचे कापड घालण्यात आले आहे. या कापडामुळे उन्हापासून गांडुळांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या बेडमध्ये भाजीची पाने, पालेभाज्याचा कचरा व अन्य कचरा बारीक करून टाकला जातो. त्यावर जनावरांचे शेण टाकून त्यात उच्च दर्जाचे गांडूळ कल्चर सोडण्यात आले आहे. भाजीपाल्याचा कचरा गांडुळांसाठी पोषक असून तो कचरा खाऊन हे गांडूळ 50 ते 60 दिवसांत गांडूळ खताची निर्मिती करतात.
सध्या सर्वत्र सेंद्रिय शेतीचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबवला जातो. भाजीपाल्यापासून तयार करण्यात आलेले गांडूळ खत हे शेतीसाठी उपयुक्त असून त्याला चांगली मागणी आहे. शेतीसाठी गांडूळ खताचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, शिवाय पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. या प्रकल्पापासून तयार होणार्या गांडूळ खताच्या विक्रीमुळे बाजार समितीला उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार होणार आहे.
बाजार समितीच्या अधिपत्याखाली हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून जे गांडूळ खत उत्पादन होईल, त्याची विक्री व्यवस्था ही बाजार समितीच्या आवारातच करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांचे मार्गदर्शन मागविण्यात आले असून त्यांच्या सूचनेनुसार या खताची विक्री व्यवस्था राबविण्यात येईल, असे समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले.