कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह 36 कल्याणकारी मंडळांची स्थापना लवकरच करणार असल्याची घोषणा ग्रामविकास व कामगारमंत्री तथा बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. यातून राज्यातील 4 कोटी असंघटित मजुरांच्या जीवनात स्थैर्य आणू, असा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे भाजपने पुढच्या निवडणुकीत नाव काढायचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिशा फाऊंडेशनमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभवाटप या कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राजीव आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, युवराज पाटील, राजेश लाटकर, सूर्यकांत पाटील, डी. जी. भास्कर, जालिंदर पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाकडे 13 हजार कोटी रुपये शिल्लक असून, त्याचे व्याज व महिन्याला जमा होणारे 250 कोटीही खर्च होत नाहीत, ही शोकांतिका आहे. बांधकामांकडून जमा होणार्या उपकराची तपासणी करणार आहे. तसेच लाखो बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ देता येत नाही. त्यासाठी बांधकाम कामगार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दिशा फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. सामंजस्य करारानुसार या योजनेचा कोल्हापुरात प्रारंभ झाला आहे.
गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केले. आता शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह 36 प्रकारच्या मंडळांची स्थापना करणार आहे. शेतमजूर मंडळासाठी बाजार समितीत येणार्या शेतमालावर उपकर आकारला जाईल. त्यातून मंंडळासाठी निधी उभा करू तसेच यंत्रमाग कामगारांसाठी सूतगिरण्यांवर उपकर लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बांधकाम कामगार मंडळाचे सचिव श्री. चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविक केले. दिशा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अंजली बोर्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. पात्र लाभार्थ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी आभार मानले. यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.