कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भविष्यातील पाण्याचे संकट ओळखून शिवाजी विद्यापीठाने जमिनीवर 32 कोटी लिटर पाणीसाठा केला आहे. जलसमृद्ध असणारे 'पाणी'दार शिवाजी विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे.
विद्यापीठास 853 एकरांचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी परिसरात राजाराम तलाव बांधला आहे. तेथून विद्यापीठ वापरासाठी पाणी घेऊ लागले. विद्यापीठाचा विस्तार वाढल्यानंतर महापालिकेकडून पाणी घ्यायला सुरुवात झाली. यासाठी दर महिन्याला 8 लाख रुपये याप्रमाणे वर्षाचे 96 लाख रुपये खर्च करावे लागत होते. आजघडीला विद्यापीठात 2 तलाव, 23 शेततळी, 10 विहिरींमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साठविले जाते. काही गेल्या वर्षांत विद्यापीठाच्या पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या आठ वर्षांत विद्यापीठ परिसरात सुमारे 30 हजारांहून अधिक विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. सध्या 32 कोटी लिटर पाणी विद्यापीठात साठविले जात आहे. वेस्ट वॉटरवर 200 नारळ झाडांची बाग फुलली आहे. घाणपाणी स्वच्छ पाण्यात मिसळू नये यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी पाच सांडपाणी प्रकल्प उभारले असून विद्यापीठातील उद्याने फुलवली जात आहेत.