कोल्हापूर

शिवाजी मंडळाकडे ‘सतेज’ चषक

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अटीतटीच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर 3 विरुद्ध 1 अशा गोलफरकाने मात करून 'सतेज' चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. हजारो फुटबॉलप्रेमींच्या उत्साहित उपस्थितीत रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना झाला. नेहमीप्रमाणेच याही स्पर्धेला हुल्लडबाजीचे गोलबोट लागलेच.

पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली. 'सतेज' चषकापूर्वी झालेल्या 'के. एम. चॅम्पियन' चषकाची अंतिम लढतही शिवाजी मंडळ व दिलबहार यांच्यात झाली होती. यात दिलबहारने शिवाजी मंडळचा पराभव केला होता. 'सतेज' चषकासाठी पुन्हा दोन्ही संघ आमने-सामने आले होते. यामुळे ही स्पर्धा जिंकून दिलबहार विजयी घोडदौड राखणार का? शिवाजी मंडळ बाजी मारणार का? याबाबतची समर्थकांतील इर्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती. सामना पाहाण्यासाठी मैदान खचाखच भरले होते.

संकेत साळोखेचे दोन गोल

अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. शिवाजीने गोलसाठी खोलवर चढायांना सुरुवात केली. 6 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत शुभम साळोखेने गोलची नोंद करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून 22 व्या मिनिटाला मोहंमद खुर्शीदने गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. मात्र शिवाजीकडून पाठोपाठ 24 व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धातही शिवाजीचा आक्रमक पवित्रा कायम होता. 48 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत करण चव्हाण-बंदरेच्या पासवर संकेत साळोखे याने वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा गोल केला. दोन गोलने पिछाडीवर असणार्‍या दिलबहारकडून गोल फेडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. मात्र शिवाजीचा भक्कम बचाव आणि गोलरक्षक मयुरेश चौगुलेची उत्कृष्ट कामगिरी यामुळे दिलबहारला उर्वरित गोलची परतफेड करता आली नाही. यामुळे सामना शिवाजी मंडळने 3-1 असा जिंकला. सामन्यात नियमबाह्य खेळ केल्याबद्दल दिलबहारच्या सनी सणगर याला दोन यलो कार्ड मिळाल्याने सामन्याबाहेर व्हावे लागले.

नेत्रदीपक आतषबाजीत बक्षीस समारंभ

सामना संपल्यानंतर नेत्रदीपक लाईट-साऊंड सिस्टीम आणि आतषबाजीत दिमाखदार बक्षीस समारंभ झाला. तत्पूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांचा 50 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. विजेत्या-उपविजेत्या संघांसह वैयक्तिक कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा गौरव पालकमंत्री सतेज पाटील, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो. च्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्या हस्ते झाला.

यावेळी आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, डॉ. भारत कोटकर, माजी महापौर सागर चव्हाण, सचिन चव्हाण, संजय मोहिते, अदिल फरास, रवी आवळे, शरद माळी, अश्किन आजरेकर, किरण साळोखे आदी उपस्थित होते. संयोजन एस. वाय. सरनाईक, बाळ निचिते, राजेंद्र ठोंबरे, संदीप सरनाईक, संपत जाधव, पराग हवालदार व सहकार्‍यांनी केले. संपूर्ण स्पर्धेत फुटबॉल निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी जबाबदारी सांभाळली.

बक्षिसांचा वर्षाव…
विजयी संघ : शिवाजी तरुण मंडळ : 2 लाख व चषक
उपविजेता : दिलबहार तालीम मंडळ : 1 लाख व चषक
तृतीय क्रमांक : खंडोबा तालीम : 25 हजार
चतुर्थ क्रमांक : फुलेवाडी मंडळ : 25 हजार
मालिकावीर : संकेत साळाखे : दुचाकी गाडी
उत्कृष्ट खेळाडू : (प्रत्येकी 15 हजार रुपये)
गोली : मयुरेश चौगुले (शिवाजी मंडळ)
हाफ : जावेद जमादार (दिलबहार तालीम)
फॉरवर्ड : संकेत साळोखे (शिवाजी मंडळ)
डिफेन्स : पवन माळी (दिलबहार तालीम)
महिला प्रेक्षकांसाठी : पैठणी साड्या
पुरुष प्रेक्षकांसाठी : 1500 रुपये गिफ्ट व्हाऊचर
गोलसाठी : माजी महापौर सागर चव्हाण यांच्याकडून 44 हजार यासह एकूण 55 हजारांची बक्षिसे.

SCROLL FOR NEXT