कोल्हापूर

शिवसैनिकांनी संघर्षासाठी सज्ज राहावे : दिवाकर रावते

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा संघर्षाची लढाई करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. जिल्ह्यातून 3 लाख शिवसैनिकांची सभासद नोंदणी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केले. कोल्हापुरात आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी रावते म्हणाले, गावागावांत घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा हा संकल्प गावागावांत पोहोचवा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका संभाव्य उमेदवारांची यादी 10 दिवसांत शिवसेना भवनला पाठवावी. शिवसेनेच्या फुटलेल्या गद्दार आमदारांविरुद्ध कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने पहिल्यांदा मोठा मोर्चा काढून कोल्हापूर जिल्हा हा चळवळीचा आहे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे, हे दाखवून दिले. जुलमी सत्तेच्या विरोधात शिवसेनेच्या निष्ठेची लढाई सुरू झाली आहे. ही लढाई पुढील सर्व सार्वत्रिक निवडणुका जिंकून यशस्वी करावे, असे आवाहन केले.

यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, मंजित माने, सौ. शुभांगी पोवार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी सुनील मोदी यांनी आभार मानले.

निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या हाती लागणार नाहीत : संजय पवार

कोल्हापुरातील शिवसैनिकांना शिंदे गटात यावे यासाठी धमकावणे , पद तसेच पैशाचे आमिष दाखविणारे कोकणातील काही दलाल कोल्हापुरात आले आहेत; पण कोल्हापुरातील निष्ठावंत शिवसैनिक कधीही त्यांच्या हाताला लागणार नाहीत. शिवसैनिकांना धमकावण्याचे प्रकार थांबले नाहीत तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, दोन मंत्र्यांची सत्ता टिकणार नाही हे लक्षात येताच कोकणातील काही आमदार, माजी मंत्री हे शिवसैनिकांना पैशाचे व पदाचे आमिष दाखवत आहेत. कोणत्याही स्थितीत सरकार पडणार हे माहीत असल्याने ते आपली संघटना मोठी करण्यासाठी असे कृत्य करत आहेत. असे लोक सापडतील तेव्हा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे खा. धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असून, आम्ही त्यात सहभागी होणार आहोत. मंडलिक यांच्याविरोधातील आंदोलन लवकरच जाहीर केले जाईल. विजय देवणे यांनी, खासगी एजन्सीमार्फत शिवसैनिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न सफल होणार नाही. दोन खासदार व राधानगरी-भुदरगडचे आमदार गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेला नाही, असे सांगितले. यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT