कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीराजे यांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवू नका ते देशभर पोहोचवा, या आपल्या संदेशातून प्रेरणा घेऊनच 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याची संकल्पना सत्यात उतरवली आहे. या महानाट्याचे प्रेरणास्रोत आपणच आहात, अशा शब्दात अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग कोल्हापुरात होत आहे. यानिमित्ताने डॉ. अमोल कोल्हे यांनी दै. 'पुढारी' कार्यालयास सदिच्छा भेट देऊन डॉ. जाधव यांचे आशीर्वाद घेतले.
'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी 2022 साली डॉ. कोल्हे कोल्हापुरात आले होते. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याबरोबर चर्चा झाली. तेव्हा डॉ. जाधव यांनी छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्यावर ज्या मालिका होतात, त्यातील प्रत्येक भागावर तीन तासांचा चित्रपट होऊ शकेल, असे सांगितले होते. हाच संदर्भ घेऊन 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याची प्रेरणा मिळाल्याचे कोल्हे यांनी डॉ. जाधव यांना सांगितले.
यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी चित्रपट, नाटक हे सक्षम माध्यम आहे. अन्य देशांतील नागरिकांनी आपला इतिहास केवळ आपल्या देशापुरताच मर्यादित न ठेवता तो अन्य देशांत पोहोचविला. बि—टन साम—ाज्य आणि मोघल राजवटीचा इतिहास नेटफ्लेक्स किंवा इतर माध्यमातून जगभर पोहोचवितात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे कार्य मोठे आहे, त्याचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरताच न करता अन्य भाषेतही करा. हिंदी भाषेतून अन्य राज्यात या महानाट्याचे प्रयोग करण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी या महानाट्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रयोग पूर्ण झाल्यानंतर हिंदी भाषेत डबिंग करून अन्य राज्यात या महानाट्याचे निश्चित प्रयोग करू, असे आश्वासन दिले. यावेळी महानाट्याचे दिग्दर्शक महेंद्र महाडिक उपस्थित होते.