दीपक केसरकर  
कोल्हापूर

शिल्लक शिवसेनाही राष्ट्रवादी संपवणार : दीपक केसरकर

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीत आता शिवसेनेचे काय स्थान राहिले आहे? असा सवाल करत, शिल्लक राहिलेली शिवसेनाही राष्ट्रवादी संपवणार, असा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केला. खा. संजय राऊत यांनी केवळ बोलण्यापलीकडे दुसरे काय केले? असा सवाल करत त्यांच्यावरही टीका केली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना संपवण्याचाच काँग्रेस-राष्ट्रवादीचा विशेषत: राष्ट्रवादीचा अजेंडा होता. अजूनही शरद पवार जोपर्यंत 'हो' म्हणत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेत कोणालाही प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत शिवसेना कोणाशी युतीही करू शकत नाही, असा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती नको, त्यातून बाहेर पडा, हीच आमची मागणी होती. मुख्यमंत्रिपदही तुमच्याकडेच ठेवा आणि जो जुना सोबती आहे, त्याच्यासोबत जाऊ, असे एकनाथ शिंदे यांनीही सांगितले होते; मात्र उद्धव ठाकरे यांनी ते ऐकले नाही, असे केसरकर यांनी सांगितले.
कोण ज्ञानी असतो, कोणाकडे पोपट असतो, प्रत्येकाचे ज्योतिष खरे होईल असे नाही. राऊत यांचे सरकारविरोधातील ज्योतिष खोटे ठरेल, असे सांगत नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर केलेल्या टीकेबाबत मी बोलू शकणार नाही. मात्र, बोलण्यापलीकडे काहीही न करणार्‍या राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मी राणे यांना देईन, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील 666 शाळांना परवानगी नाही, याबाबत येणारा अहवाल तपासून ज्या शाळा नियमित करणे शक्य आहे त्या करू. ज्यांच्या अनियमितता गंभीर आहेत, त्यांच्यावर कारवाईचा त्यावेळी निर्णय घेऊ. संचालकांच्या बोगस स्वाक्षरी आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असे सांगत आरटीआय प्रवेशांबाबत संबंधित शाळांना 82 कोटींचे अनुदान दिले आहे. उर्वरित अनुदानही देण्याची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात नियमित शाळा प्रवेश झाल्यानंतरच आरटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा विचार आहे. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT