शित्तूरच्या जवानामुळे अक्‍कलकोटचा वृद्ध ओडिशात सापडला! 
कोल्हापूर

शित्तूरच्या जवानामुळे अक्‍कलकोटचा वृद्ध ओडिशात सापडला!

backup backup

सरुड : चंद्रकांत मुदुगडे : त्यांचं वय साठीकडं झुकलेलं. त्यात दिव्यांग म्हणून त्यांना स्मृतिभ्रंश जडलेला. एकेदिवशी सोलापूरला नातेवाईकांकडे गेले; परंतु नावीदगी (ता.अक्‍कलकोट) येथील घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पोलिस ठाण्यात 'मिसिंग' दाखल केले; पण कुठलं काय..! तीन वर्षे लोटली तरी त्यांचा कुठेच शोध लागेना. दुसरीकडे कोरोना संकटात सारे जग जागीच स्तब्ध झाले होते, त्यामुळे कोरोनाच्या थैमानामुळे 'ते' परत येतील, ही अशाच आता कुटुंबीयांनी सोडली होती; परंतु दैवाचा फेरा काही न्याराच असतो, असे म्हणतात त्याप्रमाणे अचानक एकेदिवशी घरी मोबाईलवर कॉल आला, आणि ओडिशा राज्यात 'ते' सुखरूप असल्याचे समजताच घरच्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. अक्‍कलकोटच्या या बेपत्ता वृद्धाचा शोध लागला तो शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूरच्या युवराज हैबती तळप या शेरदिल जवानामुळे!

नावीदगी (ता. अक्‍कलकोट) येथील दिगंबर जाधव या साठीकडे झुकलेल्या; परंतु दिव्यांग असलेल्या व्यक्‍तीची तितकीच ही हळवी कहाणी. दिगंबर जाधव हे सोलापूरला नातेवाईकांकडे गेले ते परत घरी आलेच नाहीत. नकळतपणे रेल्वेत चढलेले दिगंबर जाधव थेट ओडिशा राज्यात पोहोचले होते. मग काय.. 'जिकडं फुडा.. तिकडं मुलूख थोडा' या म्हणीची प्रचिती यावी याप्रमाणे दिगंबर यांची ओडिशाच्या रस्त्यांवर भटकंती सुरू झाली.

'कुठून आलो अन् कुठे जायचंय' हेच दिव्यांग दिगंबर यांना अवगत नसल्याने मिळेल ते खाऊन यांचा हा अनोळखी मार्गावरचा प्रवास सुरू होता. असेच एका रात्री रस्त्याकडेला कोपर्‍यात थंडीत कुडकुडत पडलेल्या दिगंबर यांना देशसेवेतून नुकतेच निवृत्त झालेले मेजर सुभेदार चित्तरंजन आचार्य यांनी पाहिले. आचार्य यांनी न राहावल्याने जवळ जाऊन विचारपूस केली. नाव-गाव विचारले, परंतु स्वतःची मराठी भाषा विसरलेल्या दिगंबर यांना हिंदी भाषेचा कुठला गंध. त्यामुळे हिंदी भाषिक आचार्यना दिगंबर यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. आचार्य यांनी त्यांना आपल्या हॉटेलमध्ये आणून इतर सहकार्‍यांसोबत ठेवले.

पुढे एक महिन्याच्या कालावधीत दिगंबर यांच्या अधूनमधून लहरी मराठी बोलण्यातून ते महाराष्ट्रीयन असल्याचे आचार्य यांनी हेरले. योगायोगाने आचार्य यांच्यासोबत जम्मू-काश्मीर येथे देशसेवा बजावणार्‍या युवराज तळप (शित्तूर तर्फ मलकापूर पैकी तळपवाडी) या महाराष्ट्रीयन जवानाचा त्यांना ख्यालीखुशालीबाबत फोन आला. दोघांमध्ये इकडच्यातिकडच्या गप्पागोष्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातील एकजण चुकून ओडिशात आला असल्याचे आचार्य यांनी युवराज यांना सांगितले. तसेच दिगंबर यांचा युवराज यांच्याशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला; परंतु विसरभोळ्या दिव्यांग दिगंबर यांचा म्हणावा तसा संवाद झाला नाही. पुढेही असे बर्‍याचदा प्रयत्न करूनही यश आले नाही. दरम्यान, हार न मानणारे आचार्य जेव्हा केव्हा दिगंबरसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे, त्या त्या वेळी युवराजशी कॉल जोडायचे. यातून दिगंबर ही व्यक्ती सोलापूर, पंढरपूर परिसरातील असावी, असा अंदाज बांधलेल्या फौजी युवराज यांनी 'साहेब ! काळजी करू नका, त्या व्यक्तीला त्याच्या घरी नक्की पोहोचवू' असे आचार्य यांना सांगितले.

देशसेवेचे वेड रक्तात भिनलेल्या युवराज आणि आचार्य यांनी दररोज नवनव्या क्लृप्त्या वापरून दिगंबर यांचे गाव आणि घरचा पत्ता शोधण्याची मोहीमच उघडली. यामध्ये दिगंबर यांनीही बोलता बोलता गावचे नाव नावीदगी ऐवजी दिघीनवी असा ओझरता उल्लेख केला. इतकाच काय तो आशेचा किरण.

दरम्यान, गुगलबरोबरच उपलब्ध मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने अक्कलकोट तालुक्यात नावीदगी हे गाव असल्याचे युवराज यांनी शोधून काढले आणि गावातील पोस्ट ऑफिसचा फोन नंबरही मिळवला. येथील मल्लिकार्जुन नामक अधिकार्‍यांना गावातील बेपत्ता असलेल्या व्यक्तीची माहिती घेण्याची विनंती केली. सैन्यदलातून आलेल्या या फोनची दखल घेत मल्लिकार्जुन यांनी पोस्टमनला माहिती घेण्यास सांगितले. त्यात गावातील तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दिगंबर या व्यक्तीची माहिती समोर आली. शेवटी वर्णनावरून खात्री पटल्यावर दिगंबर यांच्या घरातील व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळवून युवराज यांनी दिगंबर हे ओडिशामध्ये सुखरूप असल्याची सुखद बातमी दिली.

हे ऐकताच घरात प्रत्येकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरात जणू दिवाळी साजरी झाली. ओडिशामधील आचार्य यांना फोन जोडून दिगंबर यांच्याशी घरच्यांचे पुसटसे बोलणे झाले. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिगंबर यांचे फोटो पाठवले गेले. मग आचार्य यांनी दिगंबर यांच्या घरच्यांना ओडिशाला रेल्वेने येण्यासाठी आवश्यक मदतही केली. अखेर दिगंबर यांचा भाऊ, मुलगा व अन्य एक शेजारी ओडिशाला गेले आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचून दिगंबर यांना घेऊन माघारी नावीदगी गावात पोहोचले.

कोरोना काळातही माणुसकी जिवंत…

कोरोनाच्या संकटात माणूस माणसापासून दुरावल्याचे चित्र निर्माण झालेले प्रत्येकाने पाहिले. कितीही जवळचा संबंध असला तरी अंतराची दरी निर्माण झाली होती. अशावेळी परमुलखात बेवारस आढळून आलेल्या दिगंबर यांना हिंदी भाषिक असणार्‍या मेजर सुभेदार आचार्य यांनी केवळ जवळच केले असे नाही तर त्यांच्या राहण्यासह जेवणाची, कपडालत्ता याची काळजी घेतली. आजारी पडलेल्या दिगंबर यांची सेवा शुश्रूषा करून कोरोना काळातही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT