कोल्हापूर

शाहूवाडीतील शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर निष्ठा अढळ

मोहन कारंडे

सरुड; चंद्रकांत मुदूगडे : तत्कालीन शिवसेना गटनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात अभूतपूर्व असे बंडाचे निशाण फडकावल्यामुळे शाहूवाडी ग्रामीण भागातील सामान्य शिवसैनिक कमालीचा अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनीही 'सत्ता हेच सूत्र' प्रमाण मानून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाची निशाणी खांद्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र, राजकीय प्रवासात अगदीच पडत्या काळात जीवाभावाची साथ दिली, पक्षादेश मानून लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान केले, अशा कोणत्याही शिवसैनिकाला विचारात न घेता खा. माने यांनी उचललेले हे पाऊल शाहूवाडीसारख्या डोंगराळ तालुक्यातील हाडाच्या शिवसैनिकांच्या भावना दुखावणारे ठरले आहे. यानिमित्ताने पक्षाचा 'हीरो' बनून राजकीय झंझावात निर्माण करण्याची चालून आलेली आयती संधी खा. माने यांनी स्वतःहून दवडल्याचे येथील प्रत्येक शिवसैनिकाचे म्हणणे आहे. यातून शाहूवाडीतील शिवसैनिकांची 'मातोश्री'वर निष्ठा अढळ असल्याचे अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर खा. माने यांची संदिग्ध भूमिकाच मुळात शिवसैनिकांना खटकली होती. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत शाहूवाडी तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी खा. माने यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून 'फुटीर म्हणून माथी कलंक लावून घेऊ नका', असे समजावण्याचा प्रयत्न केला होता. याउलट मुख्यमंत्री
शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे गुणगान करणार्‍या खा. माने यांच्याकडून बंडखोरीच्या मार्गावरील पाऊल मागे घेणार नसल्याचे संकेत मिळाल्याने संबंधित पदाधिकारी जड अंतःकरणाने माघारी परतले होते, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शाहूवाडी तालुक्याचे राजकारण प्रत्येक टप्प्यावर वेगळा रंग दाखवते. येथील मतदार भोळाभाबडा असला तरी तो कोणाला कधी खांद्यावर घेईल आणि कोणाचं गाठोडं बांधून घरचा रस्ता दाखवील, याची खात्री देता येत नाही. विधानसभा निवडणुकीत पक्ष नव्हे तर गट-तट ठरलेले आहेत. हाच मतदार लोकसभेवेळी मात्र खर्‍या अर्थाने आपले सार्वभौमत्व सिद्ध करताना दिसतो. म्हणूनच शाहूवाडी तालुक्यातील जनतेने आजवर अनेक राजकीय धुरिणांचे अंदाज चुकविल्याचा इतिहास आहे. यात शिवसैनिक नेहमीच आघाडीवर राहिला आहे. डोंगर कपारीत वास्तव्य आणि वाट्याचे विस्थापित जीवन जगणारा येथील शिवसैनिक कोणाच्या ताटाखाली वावरत नाही. आजवर झालेल्या बंडाळ्यामध्ये हा शिवसैनिक 'मातोश्री'शी इमान बाळगून राहिला आहे. तितकाच मुंबईतील चाकरमान्यांशी त्याचा अतूट असा भावनिक बंध राहिला आहे.

माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. खा. माने यांना शिवसेनेत आणण्यापासून ते लोकसभेत निवडून आणण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये सरूडकर अग्रभागी होते. इतकेच नव्हे तर 'दो हंसो का जोडा' म्हणून स्वतः खा. माने यांनी सरूडकर यांच्याशी असलेल्या मैत्रीचा अनेक व्यसपीठांवरून उल्लेख केला आहे. आता माने यांच्या या मैत्रीबरोबरच शिवसैनिकांच्या भावनांचं काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शाहूवाडीत 'ना कसला संपर्क.. ना ठोस विकासाचे धोरण' या अनास्थेमुळे खा. धैर्यशील माने यांच्याविषयी आधीच नाराजीचा सूर उमटत होता. त्यातच त्यांच्या या बंडखोरीने आगीत तेल ओतल्याचा अनुभव आल्यास आश्चर्य वाटायला नको. पुढील लोकसभेचा मार्ग सुकर करण्याचा उपाय म्हणून खासदारांनी आ. विनय कोरे यांच्याशी गुप्त खलबते केल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यातून माने यांचा स्वार्थ लपून राहिलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT