कोल्हापूर : सायबर वूमेन्स कॉलेजमध्ये आयोजित व्याख्यानप्रसंगी डॉ. मंजुश्री पवार यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, ज्योती हिरेमठ, तेजस्विनी चिले आदी. (छाया ः नाज ट्रेनर)  
कोल्हापूर

‘शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांत सामाजिक समतेची जाणीव’

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांच्या संकल्पनेत व्यापक सामाजिक समतेची उत्स्फूर्त जाणीव होती. या जाणिवेतूनच स्त्री उद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करत असतानाच त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा वसा व वारसा राजर्षी शाहू महाराजांनी दिला आहे, यातील स्त्री सबलीकरणाचे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार यांनी केले.

दै.'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व सायबरच्या कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन्सतर्फे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री सबलीकरणाचे कार्य' या विषयावर मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर होत्या. प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. स्त्रीशक्तीचा जागर करणार्‍या नवरात्रौत्सवानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

मंजुश्री जयसिंगराव पवार म्हणाल्या, 'राजर्षी शाहू महाराजांचा स्त्रियांच्या उन्नतीविषयीचा द़ृष्टिकोन स्त्री कर्तृत्वाला आकाश मिळवून देणारा होता. यातून स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करणारे पाच कायदे त्यांनी संस्थानात पारित केले.'

घरगुती छळ प्रतिबंध कायदा 1919 नुसार त्यांनी शारीरिक पिळवणुकीबरोबर मानसिक छळसुद्धा गुन्ह्यास पात्र असल्याचे कलम निश्चित केले. स्त्रियांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी शैक्षणिक प्रगती व संविधान अधिकार या प्रभावी शस्त्रांचा त्यांनी वापर केला.
दरेकर म्हणाल्या, 'करवीरनगरीच्या छत्रपती ताराराणींचा वारसा स्त्रियांनी अबाधित ठेवून विविध क्षेत्रांत स्थान निर्माण करावे. युवतींनी धैर्याने आव्हानांना सामोरे जाताना नवीन क्षेत्रांत कार्यरत व्हावे.

यावेळी विभागप्रमुख ज्योती हिरेमठ, बी. एस. गोरे, अमर मेस्त्री आदी उपस्थित होते. तेजस्विनी चिले यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT