कोल्हापूर

वेळापत्रक, नियोजन, सराव हेच ‘नीट’च्या यशाचे सूत्र : प्रा. कुरणे

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अभ्यासक्रमाचे वेळापत्रक, त्यानुसार योग्य नियोजन आणि सराव हेच 'नीट' परीक्षेच्या यशाचे सूत्र आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रा. एम. के. कुरणे यांनी केले. दैनिक 'पुढारी' आयोजित 'एज्युदिशा प्रदर्शना'त 'नीट परीक्षा मार्गदर्शन' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे साहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र मांडवकर होते. यावेळी
प्रा. ऋषिकेश बोडके, डॉ. राजू वणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, सीए, शिक्षक अशा अनेक क्षेत्रांत काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे लाखो विद्यार्थी आहेत. त्यांच्या या स्वप्नाला पूर्णत्व 'नीट' परीक्षा पास झाल्यानंतर येते, असे सांगत प्रा. कुरणे म्हणाले, 'नीट' परीक्षेचे यश हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तीन महत्त्वपूर्ण घटकावर अवलंबून असते. संबंधित शिक्षण पद्धतीचे सामान्यतः माहिती, तर्कक्षमता आणि व्यावहारिक बुद्धी या घटकांवर 'नीट' परीक्षा उत्तीर्ण होणं अधिक सोयीचे ठरते. 'नीट' परीक्षेची तयारी करताना वेळेला महत्त्व असल्याने सांगत प्रा. कुरणे म्हणाले, योग्य वेळापत्रक करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन ठरवणे आवश्यक आहे. या परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा असून यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि प्रश्नांच्या बाबतीतही गोंधळ उडत नाही.

फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉर्म्युला सबस्टिट्यूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल, असेही प्रा. कुरणे यांनी सांगितले. बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, असे डॉ. वणारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT