वीजपुरवठा खंडित
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व पूरस्थितीमुळे 109 गावांचा वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला, तर 56 गावांचा अंशत: खंडित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 254 वीज ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. महावितरणची यंत्रणा सज्ज असून शक्य तिथे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. महावितरणने पूरपूर्व नियोजन केले आहे. आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवली आहे. वीज ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.
पूरस्थितीमुळे कोल्हापूर शहरातील 3 उपकेंद्रे (नागाळा, दुधाळी व गांधीनगर) 19 वीजवाहिन्या, 503 वितरण रोहित्रे बंद असल्याने 50 हजार 323 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कोल्हापूर ग्रामीण एकमधील 6 उपकेंद्रे (वेतवडे, दिघवडे, बोलोली, थावडे, कांचनवाडी, सातवे व राशिवडे), 25 वीजवाहिन्या व 677 वितरण रोहित्रे बंद आहेत. त्यामुळे परिते, कळे, शाहूवाडी, फुलेवाडी, कदमवाडी, कोडोळी, पन्हाळा व गगनबावडा या उपविभागातील 64 गावांचा वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला. 37 गावांचा काही प्रमाणात वीज गायब होती. 51 हजार 181 वीज ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.
कोल्हापूर ग्रामीण दोनमधील 6 वीजवाहिन्या व 248 वितरण रोहित्रे बंद असल्याने हुपरी, मुरगूड, कागल व राधानागरी या उपविभागातील 45 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. 15 गावांत काही प्रमाणात वीज खंडित झाली असून 12 हजार 903 वीज ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गडहिंग्लज विभागात एक (19 ग्राहक) तर जयसिंगपूर विभागात दोन (28 ग्राहक) गावांचा वीजपुरवठा खंडि?त झाला आहे.
अंकुश नाळे कोल्हापुरात दाखल
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे कोल्हापुरात आले असून त्यांनी तातडीची बैठक घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजनाबाबत आढावा घेतला.