कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठाचा हिरवागार निसर्गरम्य परिसर व कोल्हापुरी पाहुणचार यांच्या आम्ही प्रेमात पडलो आहोत, अशी भावनिक प्रतिक्रिया पंजाबच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आजादी का अमृत महोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव यानिमित्ताने 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत गौरव समारंभ झाला. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात दोन दिवस सुरू असलेल्या सांस्कृतिक उपक्रमाचा मंगळवारी समारोप झाला.
पंजाबचा विद्यार्थी नमनसिंह याने प्रातिनिधिक भावना व्यक्त केल्या. लव्हली विद्यापीठाचा परिसर मोठा वाटत होता. मात्र विद्यापीठ परिसर कसा असावा, ते शिवाजी विद्यापीठात आल्यानंतर लक्षात आले. इथला परिसर निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृद्ध आहे. कोल्हापुरी पाहुणचार हीसुद्धा प्रेमात पाडणारी गोष्ट आहे. कोल्हापूरशी कायमस्वरूपी स्नेहबंध निर्माण झाला आहे. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी सुमंत कुलकर्णी याने सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमातून पंजाबसोबत मैत्र भावाचे नाते दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, लव्हली विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल, डॉ. आर. व्ही. गुरव आणि डॉ. योजना जुगळे यांच्या हस्ते लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ संघांतील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रा. लखनपाल यांना छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.
पंजाबच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या तलाव परिसरात ध्यानधारणा करून परिसराचा आनंद घेतला. फिरत असताना हे ध्यानधारणेचे हे द़ृश्य पाहून अतिशय समाधान वाटले, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. विद्यापीठाचा परिसर ध्यानधारणा व ज्ञानसाधना या दोहोंसाठी उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.