कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ उपकेंद्र तासगाव येथे होण्यासंदर्भात आ. सुमन पाटील यांच्या विनंतीनुसार बैठक घेतली होती. तासगाव उपकेंद्र मंजूर झाले, असे आपण म्हटलेले नाही किंवा त्यासंदर्भातील आदेश काढलेला नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केली.
राज्यातील महाविद्यालयांचे 15 सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल. सध्यातरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये ऑनलाईनच सुरू राहतील. ऑफलाईन सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा दौर्यावर असताना शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे 12 दिवसांचे शिवसंपर्क अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.
बारावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतरच सीईटी परीक्षा
बारावीचे निकालाचे गुणपत्रक अद्याप राज्य मंडळाकडून तयार झाले नसल्याने सामाईक परीक्षा (सीईटी) झालेली नाही. परंतु सीईटी नोंदणीची लिंक जाहीर केली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. मात्र, बारावीचे गुणपत्रक मिळत नाही तोपर्यंत सीईटी परीक्षा घेतली जाणार नाही, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.