कोल्हापूर ः कोल्हापूर धार्मिक आणि पर्यटनद़ृष्ट्या महत्त्वाचे असून येथील विकासासाठी कटिबद्ध आहोत. विकासासाठी मी स्वतः कोल्हापूर दत्तक घेतले आहे. शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे करून कोल्हापूर खड्डेमुक्त करणार, असे ठोस आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. महायुतीचे राजेश क्षीरसागर यांना विजयी करण्याचे आवाहन खा. शिंदे यांनी केले.
बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या बैठकीत खा. शिंदे यांनी विविध प्रश्न सोडवण्याचे अभिवचनही दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, शिवसेना उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याकडून यापुढे कोल्हापूरचा जोमाने विश्वासपूर्ण विकास होईल, अशी खात्री अनेकांनी बोलून दाखवली. क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिकेत येणार्या अडचणी दूर व्हाव्यात. ऑनलाईन परवानगीतील त्रुटी दूर करून अधिकार्यांना टाईम लिमिट द्यावे, असे सांगितले. विक्रम बेडेकर यांनी महसूलमधील कायदे बदलले पाहिजे. महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला असून तो लवकर मार्गी लागावा, असे सांगितले. आर्किटेक्ट असो. अध्यक्ष अजय कोराने यांनी महापालिकेत टेक्निकल स्टाफ कमी असल्याने रेडीरेकनर एनओसी घेताना वेळ लागतो. तसेच ब्ल्यू लाईन रिवाईज करावी, असे सांगितले. शंकर गावडे यांनी रिंगरोड, तर सचिन ओसवाल यांनी टीडीआर व युएलसीबाबत बदल करण्याच्या सूचना केल्या. विजय गव्हाणे यांनी पर्यटन आराखडा, तर प्रकाश देवलापूरकर यांनी हद्दवाढ करण्याची मागणी केली.
राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याकडून कोल्हापूरमध्ये गेल्या दोन वर्षांत ठोस विकासकामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षांत कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी युती सरकारचा प्रयत्न राहील. यावेळी सत्यजित जाधव यांनी शाहू मिल डेव्हलपमेंटबाबत मार्गदर्शन केले.