कोल्हापूर

वारणा समूहाला वरदान ठरणारा 44 मेगावॅटचा वीज प्रकल्प

Arun Patil

वारणानगर ; प्रकाश मोहरेकर : देशातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांतील सर्वात मोठा व बीओटी तत्त्वावरील 44 मेगावॅटचा, बगॅसपासून सहवीजनिर्मिती प्रकल्प अनेक संघर्षातून एक तपानंतर वारणा समूहाच्या मालकीचा झाला आहे. साडेतीनशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या ऊर्जांकुर प्रकल्पातून वार्षिक 100 कोटी रुपयांचे उत्पन्न असल्याने हा प्रकल्प वारणा समूहाला वरदान ठरणार्‍या प्रकल्पाचे हस्तांतर झाले आहे. या आनंदप्रीत्यर्थ शुक्रवारी (दि.19) नवचंडीयज्ञ व वारणाच्या सभासदांना सुरूची भोजनाचा सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त…

भारतातील सहकारी आणि महाराष्ट्रातील खासगी सहकारी साखर कारखान्यांतील सर्वात मोठा 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या तत्त्वारील बगॅसपासून वीजनिर्मिती करणारा ऊर्जांकुर सहवीजनिर्मिती प्रकल्प 2010-11 साली तत्कालीन ऊर्जामंत्री आ. डॉ. विनय कोरे यांनी उभारला. 350 कोटी भांडवली गुंतवणूक करून साखर कारखान्याच्या लगत असणार्‍या 80 एकर प्रशस्त जागेत या प्रकल्पाची वेगाने उभारणी केली.

त्यासाठी वारणा ते वाठार वीज वहनासाठी 132 के.व्ही.ची ट्रान्समिशन लाईन टाकली आणि शासनाच्या करारानुसार अखंडितपणे वीजपुरवठा सुरू झाला. हा करार 2026 सालापर्यंत आहे. या प्रकल्पाची आजच्या बाजारभावाप्रमाणे 800 कोटी रुपयांची भाडवली गुंतवणूक मानली जाते. दरवर्षी वीज विक्रीतून 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे आ. कोरे यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वारणा समूहाला भेट देऊन वारणा समूहाचा 'कार्बन न्यूट्रल व्हॅली' असा गौरव केला होता. यामध्ये वारणेने विविध उभारलेल्या प्रकल्पांचे योगदान आहे. तात्यासाहेब कोरे यांनी वारणा परिवाराला दिलेला वसा आणि वारसा तितक्याच नेटाने पुढे चालविण्याचा आ. कोरे प्रयत्न करीत आहेत.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

शिन निपॉन जपान तंत्रज्ञानावर आधारित रूटटर्बाईन, 110 केजी प्रेशरचे 115 टनी प्रतितास क्षमतेचे दोन स्वतंत्र बॉयलर, वारणा नदीवरून स्वतंत्र पाणीउपसा योजना, आपत्कालीन परिस्थितीत दोन कोटी लिटर क्षमतेचा पाणी साठवण्यासाठी रिझर्वायर टँक, बॉयलर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी स्वतंत्र वॉटर ट्रिटमेंट प्लँट, बगॅस टू स्टीम रेशो 2.5 उच्चतम राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर,100 टक्के रेन हार्वेस्टिंग करणारा पहिला प्रकल्प, तसेच 12 एकर जमिनीवर विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड व संवर्धन करण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT