कोल्हापूर

वर्षात जिल्ह्यातील 56 हेक्टर वृक्षाच्छादन घटले

Arun Patil

[author title="आशिष शिंदे" image="http://"][/author]

कोल्हापूर : हवामान बदलाचे गंभीर संकट कोल्हापूरभोवती घोंगावत आहे. जिल्ह्यातील बेसुमार वृक्षतोडीमुळे या संकटाने रौद्ररूप धारण केले आहे. वाढत्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची बेसुमार कत्तल होत असून, 2023 मध्ये 56 हेक्टर वृक्षाच्छादन घटले आहे, तर शहरात गेल्या वर्षभरात 167 झाडांचा बळी देण्यात आला आहे. यामध्ये 'की स्टोन स्पिसीज' असणार्‍या वडाच्या झाडांचाही समावेश आहे. या वृक्षकत्तलीमुळे उष्णतेचा उच्चांक, महापुरासारखे प्रलय, अचानक तापमानात बदल असे गंभीर परिणाम दिसत आहेत.

ग्लोबल फॉरेस्ट वॉच या संस्थेकडून 'सॅटेलाईट इमेज मॅपिंग'द्वारे जगभरातील वृक्षतोडीवर नजर ठेवली जाते. या संस्थेच्या सॅटेलाईट मॅप अहवालानुसार 2002 ते 2023 या कालावधीत कोल्हापुरातील 54 हेक्टर घनदाट जंगल घटले आहे. काँक्रिट जंगल वाढीमध्ये पर्यावरणातील 'की स्टोन स्पिसीज' समजल्या जणार्‍या वडाच्या झाडांसह इतर वृक्षांचीही कत्तल सुरू आहे.

वणवे रोखण्याचीही तितकीच गरज

वृच्छादन वृक्षतोडीबरोबरच वणव्यांमुळेही घटले आहे. 2001 ते 2023 या कालावधीत कोल्हापुरातील सुमारे 10 हेक्टर वृच्छादन हे वणव्यांमुळे घटले आहे, तर 308 हेक्टर हे इतर कारणांमुळे. 19 मे आणि 26 मे 2024 या दिवशी 21 जंगलतोडीचे 'सॅटेलाईट अलर्ट' आल्याची माहिती ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या अहवालातून समोर आली आहे. याच दिवशी इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट सिस्टीमद्वारे दोन सौम्य तीव्रतेचे वणवे पेटल्याचे अलर्टही देण्यात आले होते.

वडाच्या झाडांच्या संवर्धनाची गरज

वडाची झाडे नष्ट झाली तर पर्यावरणाचा समतोल ढासळणे हे निश्चित मानले जाते. वड मोठ्या प्रमाणात कार्बन सिंक म्हणून काम करतात. वडाचा पर्णसंभार मोठा असल्याने कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता अधिक असते; मात्र पन्हाळ्याकडे जाणार्‍या मार्गावर काहीजणांकडून हेतुपुरस्सर वडाच्या झाडांच्या मुळांना आग लावली जात असल्याची धक्कादायक बाब पर्यावरणप्रेमींनी उघड केली आहे. यामुळे वड संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT