उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा उचगाव मणेर मळा येथील लॉन्ड्री व्यवसायिक पवन सुनील हजारे (वय 28) याचा मृतदेह उजळाईवाडी विमानतळ रोडजवळ असलेल्या उदासी बुवा मठाच्या मागील विहिरीत शनिवारी सकाळी आढळून आला. दरम्यान, ही आत्महत्या की खून, याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.
उदासी बुवा मठ समाधीस्थळाच्या मागे असणार्या विहिरीत सकाळी मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन-चार दिवसांपूर्वीचा हा प्रकार असल्याने तरुणाच्या मानेला तसेच चेहर्यावर जखमा झाल्याने चेहरा पूर्ण विद्रूप झाला होता. मृतदेह जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. विच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर येथे नेण्यात आला. मृत्यू संशयास्पद असल्याने व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. दरम्यान, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये मधुसूदन वरुटे यांनी अज्ञात कारणाने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद दिली आहे.