कोल्हापूर

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त विशेष संवाद : खिलाडूवृत्ती हीच यशस्वी खेळाडूची खरी ओळख

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूरच पुढारी वृत्तसेवा : क्रीडा समीक्षक अरुण नरके; दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त विशेष संवाद. 

कोणताही खेळ आत्मसात करता शारीरिक व मानसिक सक्षमता आवश्यक असते. खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी खेळाडूंनी जमेच्या बाजू आणि उणिवा यांचा अभ्यास केला पाहिजे. खिलाडूवृत्ती हीच यशस्वी खेळाडूंची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू व क्रीडा समीक्षक अरुण नरके यांनी केले.

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त दै. 'पुढारी' संचलित 'प्रयोग' सोशल फाऊंडेशनतर्फे 'खेळ व खिलाडूवृत्ती जोपासताना' या विषयावरील आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. दै. 'पुढारी'च्या फेसबुक पेजवर या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले.

नरके म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये जिद्द – चिकाटीच्या जोरावर करिअर घडवता येते. अनेक खेळाडूंनी खेळाच्या कौशल्यावर जगभर नाव कमावले आहे. शालेय स्तरावर इतर विषयांप्रमाणेच क्रीडा विषयाला न्याय दिला तरच ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू चमकतील.

सतीश सूर्यवंशी म्हणाले, शिवकालीन मर्दानी खेळांसारख्या रांगड्या क्रीडा प्रकारांचे जतन – संवर्धन आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळाडू नक्‍कीच राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकतो.

विविध वाहिन्यांवरील थेट प्रक्षेपणामुळे अनेक क्रीडा प्रकारांना ग्लॅमर प्राप्‍त होऊन खेळाडूंचे करिअर चांगल्या पद्धतीने घडत आहे. कार्यक्रमात विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, विद्यार्थी – विद्यार्थिनी ऑनलाईन सहभागी झाले होते.

सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन

दै.'पुढारी' संचलित 'प्रयोग' सोशल फाऊंडेशनतर्फे शाळा, महाविद्यालयांमध्ये सातत्याने विविध क्रीडा प्रकारांच्या विकासासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन व नवी दिशा मिळत आहे. त्याचबरोबर मुलींना ज्युदो व कराटेसारख्या खेळांमधून आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.

SCROLL FOR NEXT