राज्यात आगामी दोन महिन्यांसाठी ‘पाणीबाणी’! Pudhari File Photo
कोल्हापूर

राज्यात आगामी दोन महिन्यांसाठी ‘पाणीबाणी’!

धरणांमध्ये केवळ 35 टक्केसाठा : 400 हून अधिक गावांत टँकरने पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी दोन महिने राज्याला ‘पाणीबाणी’चा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 35 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या राज्यातील 400 हून अधिक गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

595 टीएमसी पाणीसाठा

राज्यात मोठी 138, मध्यम 260 आणि लहान आकाराची 2,599 धरणे आहेत. सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता 1704 टीएमसी आहे. मागील वर्षी बहुतांश भागात चांगले पाऊसमान झाल्याने या धरणांमध्ये 1,500 टीएमसीच्या आसपास पाणीसाठी होता. मात्र, वाढती मागणी, बाष्पीभवन व तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या धरणांमध्ये केवळ 595 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणीसाठ्याच्या बाबतीत यंदा कोकण आणि अमरावती विभागांची अवस्था चांगली दिसत आहे. कोकणातील 173 धरणांमध्ये मिळून 50.11 टक्के तर अमरावती विभागातील 264 धरणांमध्ये 50.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूरच्या 383 धरणांमध्ये 41.85 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 920 धरणांमध्ये 41.36 टक्के पाणीसाठा राहिलेला आहे. नाशिक विभागातील 537 धरणांमध्ये 44.07 टक्के पाणीसाठा आहे. सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात आहे. पुणे विभागातील 720 धरणांमध्ये मिळून अवघा 36.63 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे यंदा पुणे विभागालाच पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे जाणवू लागली आहेत.

25 टक्केच पाणीसाठा उपयुक्त

पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत नियमानुसार धरणांमध्ये 10 टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा लागणार आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये जरी 35 टक्के पाणीसाठा दिसत असला, तरी त्यापैकी फक्त 25 टक्केच पाणीसाठ्याचा वापर करता येणार आहे. आजघडीला राज्यातील 35 धरणांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. शिवाय, 68 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ही बाब विचारात घेता राज्याला आगामी दोन महिन्यांत पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करावा लागणार आहे.

कर्नाटकचीही मागणी!

काही दिवसांपूर्वी कर्नाटकनेही महाराष्ट्राकडे चार-पाच टीएमसी पाणी देण्याची मागणी केली होती. कर्नाटकच्या विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांतील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्नाटकने ही मागणी केलेली आहे. नियमानुसार आणि मागणीनुसार कर्नाटकच्या या मागणीचीही पूर्तता करावी लागणार आहे. काळमवाडी, कोयना आणि चांदोली धरणांतून हे पाणी सोडण्याची शक्यता आहे.

मोठ्या धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा..!

कोयना (105 टीएमसी क्षमता), जायकवाडी (102 टीएमसी) आणि उजनी (117 टीएमसी) ही मोठी धरणे आहेत. यापैकी कोयना धरणात सध्या 42.70 टीएमसी (40 टक्के) पाणी शिल्लक आहे. त्यापैकी वीज वापराच्या आणि राखीव कोट्यातील पाण्याचा विचार करता कोयनेतून फार फार तर 20 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. जायकवडी धरणात सध्या 36.61 टीएमसी (35 टक्के) पाणी शिल्लक असून, त्यापैकी 15 ते 20 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. उजनी धरणामध्ये सध्या केवळ 5.27 टीएमसी म्हणजे केवळ 4.5 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

432 गावांमध्ये टँकर सुरू

राज्यातील 432 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाईल तशी टँकरग्रस्त गावांची संख्याही वाढणार आहे. कोकणातील 103, नाशिक 14, पुणे 308 आणि अमरावती विभागांतील 3 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर विभागातील एकाही गावात अजून टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. तसेच नागपूर विभागातील कोणत्याही गावामध्ये अद्याप टँकरची मागणी नाही. मात्र, हळूहळू अनेक गावांमधून टँकरची मागणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT