कोल्हापूर

राजर्षी शाहूंच्या विचारांचा सन्मान : डॉ. जयसिंगराव पवार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रेरणादायी कार्याबद्दल 'ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 'ब्रँड कोल्हापूर'चे संकल्पक आ. सतेज पाटील यांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे राजर्षी शाहूंच्या विचारांचा सन्मान आहे, अशा शब्दांत डॉ. पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. पवार यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिवाळी दरम्यान झालेल्या ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्रदान सोहळ्या वेळी त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे सोमवारी आ. पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यांसोबत घरी जाऊन डॉ. पवार यांना सन्मानित केले.

आ. सतेज पाटील म्हणाले, डॉ. पवार यांनी केलेले कार्य हे भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही वैचारिक समृद्धता देणारी आहे. यावेळी डॉ. पवार व सौ. वसुधा पवार यांच्या हस्ते आ. पाटील यांना विविध विषयांवरील पुस्तके भेट देण्यात आली. यानंतर इतिहासातील विविध विषयांवर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, उदय गायकवाड, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, प्राचार्य डॉ .महादेव नरके, अनुराधा कदम, डॉ. मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT