कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कर्मचार्यांना देण्यात येणार्या राजर्षी शाहू पुरस्कारासाठी निवडीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण समितीचे अध्यक्ष आहेत. पुरस्काराच्या नावाबद्दल चर्चा करण्यासाठी सोमवारी विभाग प्रमुखाची बैठक झाली. मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य व कर्मचार्यांना राजर्षी शाहू पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्काराच्या निवडीसाठी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते; परंतु सभागृहाची मुदत संपली असल्याने व निवडणुका न झाल्यामुळे यावर्षी केवळ कर्मचार्यांनाच पुरस्कार देण्यात येणार आहेत. आजच्या बैठकीत सीईओ चव्हाण यांनी अधिकार्यांना पुरस्कारासाठी आलेले प्रस्ताव परिपूर्ण आहेत की नाही याची खात्री करून घेण्याच्या सूचना दिल्या.
गैरवर्तनाला 2 गुण?
पुरस्कारासाठी निवड करताना कर्मचार्यांना गोपनीय अहवाल, वक्तशीरपणा, संगणकीय ज्ञान आदी बाबींसाठी 100 गुण आले आहेत. ज्यांना जादा गुण असतील त्यांची निवड केली जाते. एका प्रस्तावामध्ये गैरवर्तन कॉलममध्ये 2 गुण देण्यात आल्याने तो चर्चेचा विषय होता.
आरोग्य विभागाला सूचना
गेल्यावर्षी आरोग्य विभागामध्ये शाहू पुरस्कारामध्ये घोळ झाला होता. त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने आपले प्रस्ताव मुदतीत पाठवावे, विलंब करू नयेत, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष; आज समितीची बैठक