कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू जयंती आजपासून ‘लोकोत्सव’

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती रविवार, दि. 26 जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे साजरी होत आहे. हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून, मंगळवार, दि. 14 ते रविवार, दि. 26 जून या कालावधीत विविध लोकोपयोगी व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकोत्सवात कोल्हापूरकरांनी कर्तव्य भावनेने सहभागी होण्याचे आवाहन जयंती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष कॉ. चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत केले.

लोकोपयोगी-प्रबोधनपर उपक्रम

14 जून रोजी दुपारी 12 वाजता कपिलतीर्थ मंडईजवळ 'शाहू भोजन' सेवेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते होईल. दि. 15 रोजी सकाळी साडेअकरा वाजता दसरा चौकात राजर्षी शाहूंचे स्टीकर वाहनांवर लावण्याचा उपक्रम होईल. दि. 17 जून रोजी दुपारी 12 वाजता करवीर तहसील कार्यालय येथे जयंती उत्सव फलक अनावरण होणार आहे. याच दिवशी दुपारी 3 वाजता वाचन कट्टाच्या वतीने 'राजर्षी शाहू समजून घेताना' या विषयावर प्रा. विनय पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 18 रोजी सागर पाटील तलावात जलतरण स्पर्धा होईल.

20 जून रोजी भवानी मंडपात, साडेअकरा वाजता 'थुंकीमुक्त कोल्हापूर' विषयावर प्रबोधन व प्रतिज्ञा उपक्रम, तर दुपारी साडेतीन वाजता शाहिरी मुजरा कार्यक्रम होणार आहे. दि. 21 रोजी 12 वाजता फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यामंदिरात प्रकाश देसाई यांचे व्याख्यान आणि सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप येथे विधवा महिलांचा हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. दि. 22 रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र हायस्कूलमध्ये इंद्रजित माने यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी साडेपाच वाजता, बालकल्याण संकुलात कपडे व धान्यवाटप होणार आहे.

दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता मंगळवार पेठेतील ताराराणी विद्यालयात 'कोल्हापुरी चप्पल प्रदर्शन', दुपारी 12 वाजता राम गणेश गडकरी हॉल येथे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे व्याख्यान, दुपारी साडेचार वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पत्रकार ज्ञानेश महाराव यांचे व्याख्यान आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शनिवार, दि. 25 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू जन्मस्थळ ते छत्रपती शिवाजी चौक अशी स्केटिंग मशाल रॅली काढण्यात येणार आहे.

रविवार, दि. 26 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी चौकात राजर्षी शाहू प्रतिमापूजन आणि दुपारी साडेचार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती कॉ. यादव यांनी दिली.

पत्रकार परिषदेस रमेश मोरे, अशोक पोवार, संभाजी जगदाळे, किसन भोसले, गणी आजरेकर, दुर्गेश लिंग्रस, शाहीर दिलीप सावंत, शुभम शिरहट्टी, सौ. सुमन वाडकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT