कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू कुस्ती-फुटबॉल स्पर्धांची घोषणा

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर जिल्हा तालीम संघ व कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) यांच्या संयुक्‍त विद्यमाने 'राजर्षी छत्रपती शाहू' चषक कुस्ती व फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 23 मे या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम आणि राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानांवर या स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक संघांची फुटबॉल स्पर्धा

छत्रपती शाहू स्टेडियमवर दि. 16 ते 23 मे कालावधीमध्ये वरिष्ठ 'अ' गटाच्या फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. दि. 16 मे रोजी सकाळी साडेसात वाजता, स्पर्धेचा पहिला सामना होणार असून दुपारी 4 वाजता, जिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन समारंभ होईल. स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन मधील 'अ' गटातील सुपर सीनिअर संघाची निवड केली जाणार आहे. स्पर्धा नॉकआऊट (बाद) पधतीने घेतली जाणार आहे. विजेत्या संघास 75 हजार, उपविजेत्या संघास 50 हजार आणि तृतीय क्रमांकास 25 हजार चषक व प्रमाणपत्र बक्षीस दिले जाणार आहे.

मातीतील जिल्हा व राज्य कुस्ती स्पर्धा

खासबाग कुस्ती मैदानात दि. 20 ते 22 मे या कालावधीत जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरासाठी फ्री स्टाईल प्रकारात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 अशा वजन गटामध्ये स्पर्धा होईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना 5 हजार, 3 हजार व 2 हजार व प्रमाणपत्र देण्यात येईल. खुल्या गटासाठी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात मुलांसाठी 86 ते 125 व मुलींसाठी 65 ते 76 किलो वजनगट असेल. यातील पहिल्या तीन क्रमांकास 75, 50 व 25 हजार रुपये व चषक दिला जाईल.

स्पर्धेसाठी नाव नोंदणीकरिता अखेरचा दि. 15 मे असून कार्यालयाच्या http://kolhapursports.com/krida_sankul_yadi.html या वेबसाईटवर नोंदणी सुरू आहे. याशिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी स्टेडियम येथेही ऑफ लाईन नाव नोंदणी करता येणार असल्याची माहिती डॉ. साखरे यांनी दिली. पत्रकार परिषदेस क्रीडा अधिकारी अरुण पाटील, सचिन चव्हाण, माहिती अधिकारी वृषाली पाटील, प्रवीण कोंढावळे व कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT