मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकर्यांची अफाट जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उभारलेले श्रम मंदिर आहे. विघ्न संतुष्ट प्रवृत्ती शेतकर्यांच्या श्रम मंदिराला गालबोट लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. राजकीय द्वेषापोटी शेतकर्यांचा गळा घोटू नका, अशी समज देणारे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी दिले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षड्यंत्रामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल. कोणतीही शहानिशा न करता दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील. आ. मुश्रीफ यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतूनच गुन्हा दाखल केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
कागल येथील विवेक कुलकर्णी व अन्य ज्या 16 लोकांनी मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी ही तक्रार त्वरीत मागे घ्यावी. ही तक्रार खोटी व राजकीय दबावापोटी दिली आहे. ही तक्रार कोणाच्या सांगण्यावरून झालेली आहे, हे जग जाहीरच आहे. जनता या कुणालाही माफ करणार नाही.
बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. संपूर्ण चाळीस हजार सभासदांची तसेच या तक्रारदारांपैकी गेल्या बारा वर्षांत कोणाचीही साधी तक्रार नाही. त्यांना ही अवदसा आत्ताच का आठवली? याचेही उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल.
या पत्रकावर गोकुळचे संचालक युवराज पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, मुरगूड शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.