कोल्हापूर : राष्ट्रवादीचे युवराज पाटील, काँग्रेसचे विजयसिंह मोरे यांची 'गोकुळ'वर स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव शासन नियुक्त सदस्य म्हणून 'गोकुळ'च्या संचालक मंडळात असतील. या सर्व नावांवर 'गोकुळ'च्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षस्थानी 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील होते.
'गोकुळच्या निवडणुकीत महाडिक यांच्याविरोधात मोट बांधताना नेत्यांनी अनेक इच्छुकांना 'स्वीकृत'चे गाजर दाखविले होते. निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली, तेव्हा नेत्यांनी चालढकल सुरू केली. शिवसेनेने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे नाव शासन नियुक्त सदस्य म्हणून जाहीर केले होते. परंतु, त्यांना वर्षभर बाहेर ठेवण्यात आले. यावरून आरोपांचा धुरळा उडाला. नियुक्तीपत्र देऊनही जाधव यांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागली.
'गोकुळ'मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. संचालक मंडळात दोन स्वीकृत सदस्य व एक शासन नियुक्त अशा तिघांना संधी देता येते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने प्रत्येकी एका जागेवर आपल्या समर्थकांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कसबा सांगाव (ता. कागल) येथील युवराज पाटील यांच्याच नावाला पसंती दिली. ते हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत. काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी नावाबाबत कमालीची गोपनीयता पाळली होती. त्यांनी विजयसिंह मोरे (सरवडे, ता. राधानगरी) यांच्?या नावाची चिठ्ठी पाकिटातून 'गोकुळ' अध्यक्षांकडे पाठवून दिली. यामुळे राधानगरी तालुक्यातील 'गोकुळ'मध्ये चार संचालक झाले आहेत. दि. 17 मे रोजी होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीपासून या सदस्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.