कोल्हापूर

मुख्यमंत्री शिंदे-संभाजीराजेंची नाराजीनाट्यानंतर झाली भेट

दिनेश चोरगे

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजे हे त्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर जवळपास दीड तास थांबले. त्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली नाही. या प्रकारानंतर नाराज झालेले संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून निघून गेले. त्यांच्या नाराजीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना 'सह्याद्री'वर पाचारण केले. नंतर त्यांच्यात चर्चा झाली.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी संभाजीराजे मंत्रालयात आले होते. आधी त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे काही समन्वयकही होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल दीड ते दोन तास संभाजीराजे यांना भेटलेच नाहीत. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. त्यामुळे वारंवार निरोप देऊनही संभाजीराजे यांना ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे; मात्र समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही, अशी नाराजी यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली नव्हती. ते सचिवांना भेटायला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वनियोजित बैठक असल्याने त्यांना भेटता आले नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या नाराजीचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सह्याद्री अतिथीगृहात बोलावून घेत चर्चा केली. या भेटीत कोल्हापूरशी संबंधित काही विषयांवर चर्चा केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार : मुख्यमंत्री

  संभाजीराजे यांनी मराठा समाजाशी संबंधित अनेक विषयांवर आपल्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाणार आहे. तसे आश्वासन आपण त्यांना दिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितले.

राजर्षी शाहूंच्या स्मृती जपणार्‍या वास्तूंसाठी निधी द्या

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त राज्य शासनाने शाहूकालीन वास्तूंच्या संवर्धनासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

SCROLL FOR NEXT