नृसिंहवाडी : येथे महापूरबाधित भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. शेजारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. (छाया : अजित चौगुले, उदगाव) 
कोल्हापूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नृसिंहवाडी येथे पूरग्रस्त परिसराची पाहणी

अमृता चौगुले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. ३०) नृसिंहवाडी येथे पूरग्रस्त परिसराची पाहणी केली.

पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसल्याची जाणीव मला आहे. येथील नागरिक पुनर्वसनासाठी तयार नसल्याने त्यांनी आपापल्या गावांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. अनेक गावांत पुनर्वसनाबाबत मतमतांतरे आहेत. पण, यातूनही मार्ग काढू. शासन आपल्या पाठीशी ठाम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामस्थांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे पाणी जतसह दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा भावना व्यक्त केल्या. याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवित लवकरच याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा पोहोचला. अवघ्या 7 मिनिटांतच मुख्यमंत्री नृसिंहवाडीच्या मुख्य प्रवेशद्वारात पोहोचले. त्यानंतर बसस्थानक परिसरात पाहणी केली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी शिरोळ तालुक्याच्या पूरपरिस्थितीची माहिती दिली.

दरम्यान, सातत्याने येत असलेल्या महापुरामुळे शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रा.पं.सदस्य अमोल विभुते, संजय गवंडी, भाजपचे शहराध्यक्ष संजय हिरीकुडे, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडेकेली.

शिरोळ तालुक्यात 43 गावांत महापूर येतो. यामध्ये प्रामुख्याने फटका बसणार्‍या गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

सेवा सोसायटीतील खत, पोल्ट्री फार्म, ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन यासह पूरग्रस्तांची घरे, शेती आदींची प्रचंड हानी झाली आहे.

त्यामुळे या पूरग्रस्तांना भरघोस मदत देणे गरजेचे आहे.

महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत असल्याने यावर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख वैभव उगळे,

सरपंच पार्वती कुंभार, देवस्थानचे अध्यक्ष मेघशाम पुजारी, जयसिंगपूर शहर प्रमुख तेजस कुराडे-देशमुख, अभिजित जगदाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, तो कुचकामीच ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT