कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री शाहू विजयी गंगावेस तालमीचे 1982 चे महाराष्ट्र केसरी पैलवान संभाजी पाटील-आसगावकर (वय 62) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर आसगाव (ता. पन्हाळा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सन 1982 ला बीड येथे झालेल्या 20 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत संभाजी पाटील यांनी अजिंक्यपदासह मानाचा किताब पटकावला होता. कुस्तीपंढरी कोल्हापूरला 1980 च्या पूर्वी काही वर्षांत महाराष्ट्र केसरी गदेने हुलकावणी दिली होती. ही उणीव भरून काढत श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत वस्ताद हिंदकेसरी गणपतराव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्या पै. संभाजी पाटील यांनी मानाचा महाराष्ट्र केसरी किताब शाहूनगरी कोल्हापुरात पुन्हा एकदा खेचून आणला.
महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी त्यांची अंतिम लढत पै. सरदार खुशहाल यांच्याविरोधात झाली. 25 हजार कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत हे दोन पहाडी मल्ल एकमेकांना भिडले. पै. संभाजी पाटील यांनी 17 व्या मिनिटाला पट काढून खुशहालवर एका गुणाची कमाई केली. उरलेली 3 मिनिटे संपून पै. संभाजी पाटील 20 व्या महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी ठरले.
29 इंचांची मांडी असणारे भक्कम पैलवान
भरभक्कम शरीरयष्टी लाभलेल्या पै. संभाजी पाटील यांचा पट काढण्यात हातखंडा होता. त्यांच्यासारखे पट हल्ली दाखवायलाही शिल्लक नाहीत. त्यांची मांडी 29 इंच होती. त्यांचा पट काढणे सहजासहजी कोणालाही जमत नव्हते.