कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायालयात असून याबाबत सर्वांनीच संयम पाळायला हवा. महाराष्ट्राला यात निश्चित न्याय मिळणार आहे. सीमाप्रश्नांवर सर्वांच्या भावना एक असून हा प्रश्न सामोपचाराने सोडवला जावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेद्वारे सोडवू, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मुख्य प्रवक्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा दौर्यावर असताना सोमवारी सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा. संजय राऊत यांची सुरक्षा काढणे व कर्नाटक समन्स याबाबत मंत्री केसरकर म्हणाले, खा. राऊत यांची सुरक्षा काढणे व कर्नाटक राज्याकडून समन्स येणे या गोष्टींचा परस्पर संबंध नाही. सीमा प्रश्नाबाबत त्यांचे स्टेटमेंट घ्यावे. त्यांना पूर्ण संरक्षण देण्याचे राज्य सरकार प्रयत्न करील.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणीही बोलल्यावर भावना प्रक्षुब्ध होणार हे वास्तव आहे. याबाबत राज्यपाल यांना केंद्र सरकारकडून आवश्यक ते निर्देश दिले गेले असतील. राज्यपाल हे सर्वोच्च पद असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भावना केंद्र शासनाला कळविल्या आहेत. त्यानंतर योग्य तो निर्णय होईल.
खोक्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:ची चौकशी करून घ्यावी, या खा. राऊत यांच्या वक्त्यावर मंत्री केसरकर म्हणाले, जे लोक तत्त्वासाठी बाहेर पडले त्यांनी तुम्ही खोके-खोके म्हणून चिडवता हे म्हणण्याचा अधिकार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीपासून लांब जाऊया. पक्षातून गेलेले लोक परत येतील, असे त्यांना सांगितले होते. आता जनतेला खोके-खोके सांगत सुटले आहेत.
मुख्यमंत्री असताना 'वर्षा'त उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भेटले नाहीत. आता राज्य गेल्यावर सहानुभुतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भावनेच्या भरात केलेल्या उठावास तुम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
शिक्षण क्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यावर शिक्षकांना न्याय दिला. आमची बांधिलकी विद्यार्थी, शिक्षक व सरस्वती देवीशी आहे, असा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा मंत्री केसरकर यांनी समाचार घेतला.
हे विचार आम्हाला मान्य नाहीत
अयोध्याला गेल्यावर तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी समजता. अयोध्याला जाणारी रथयात्रा कोणी कोणत्या राज्यात अडवली हे त्यांना माहीत नव्हते का? केवळ मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतासाठी त्यांच्या मुलांची भेट घेता ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार व हिंदुत्वाशी तडजोड आहे हे विचार आम्हाला मान्य नाहीत, अशी टीका मंत्री केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.