महापूर ओसरला, घराची दारे उघडली आणि पै-पै ने उभारलेल्या संसाराची झालेली वाताहत पाहून आया-बहिणींच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. धान्याला कोंब आले, काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पिके कुजली आहेत. सधन असलेला कुरुंदवाड व परिसर, नदी काठावरील गावे सात दिवसांच्या महापुराने स्मशानवत झाली आहेत.
कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी संथ गतीने ओसरू लागले आहे. कुरुंदवाड, बस्तवाड, अकिवाट, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, दानवाड, नवे दानवाड या गावांतील बर्यापैकी महापुराचे पाणी उतरले आहे. नदी काठावरील संपन्न आणि सधन अशी या गावांची ओळख आहे. मात्र, महापुराच्या तडाख्यात काहीच शिल्लक राहिले नाही. घराघरांत चिखल, कुजलेले धान्य, सुटलेली दुर्गंधी अशी भयाण वास्तवतः या महापुराने केली आहे.
आज अनेक पूरग्रस्त कुटुंब पै-पाहुण्यांचे गाव, पूरग्रस्त छावण्या सोडल्या घराबाहेर पडताना हाताला लागेल तो नेलेला पसारा भरून त्यांनी आपले शहर आणि गाव गाठले. मात्र, घराची झालेली स्मशानवत अवस्था पाहून महिलांना रडू कोसळले.जीवनावश्यक वस्तू, धान्य, अंथरून व टीव्ही, कपडे, फ्रिज खराब झालेे.कुरुंदवाड, राजापूर, खिद्रापूर येथे काही घरे कोसळली आहेत. सर्व साहित्य या ढासळलेल्या घराखाली सापडल्याने अशा कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे. जसे पाणी वाढत गेले तशी अंगावरच्या कपड्यानिशी ही कुटुंबे बाहेर पडली होती.
मात्र, आज शहरात, गावात परतल्यावर महापुराने त्यांचा निवारा हिरावून नेल्यामुळे ते बेघर झाले आहेत. खिद्रापूर येथे अनेक घरांतील प्रापंचिक साहित्य, धान्य कुजलेले आहे. वर्षभरासाठी बेगमी केलेले गहू, ज्वारी, डाळी कुजलेले आहे. ज्वारीला कोंब फुटल्याने अनेकांनी धान्य रस्त्यावर टाकले आहे. कडधान्य, तेल, साखर याची ही अवस्था अशीच झाली आहे.
फर्निचरचेही मोठे नुकसान झाले आहे. महिलां घरातील चिखल बाहेर काढत आहेत. जनावरांचे गोठे कसे तरी तग धरून उभे आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग व अडसाली लावणीचे ऊस पीकही कुजले आहे. महापुराचे यापूर्वीचे काही संदर्भ बदलल्याने तालुक्यात भीतीयुक्त छाया पसरली आहे.
…अन् एकाच दिवसात
शिरोळ तालुक्याला सन 2005 नंतर महापुराने वेठीस धरले आहे. हे दोन्ही महापूर ऑगस्ट महिन्यात आले होते. मात्र, यंदाचा महापूर 23 जुलैच्या ढगफुटीसद़ृश पावसाने हाहाकार उडवून दिला होता. कोल्हापूरपासून शिरोळपर्यंत काहीच हाती लागणार नाही का? या चिंतेत अद्यापही नागरिक आहेत. शेतकर्यांनी तर छातीवर दगड ठेवून आला दिवस ढकलत आहेत.