म्हाकवे ; डी. एच. पाटील : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान योजनेतील 40 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पंधरा महिने उलटूनही प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकर्याला सरकारने ठेंगा दाखवला आहे.
राज्यात सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज असणार्या शेतकर्यांना कर्जमाफीची महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील कर्ज घेतलेल्या एकूण 89 लाख शेतकर्यांपैकी तब्बल 49 लाख शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरले तर उर्वरित 40 लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या योजनेतून नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांच्यासाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु पंधरा महिने होऊनही ही केवळ घोषणाच राहिली आहे.
अनेक शेतकर्यांनी प्रोत्साहन अनुदान मिळणार या आशेने आपले असणारे कर्ज दागिने गहाण ठेवून परतफेड केली आहे, मात्र प्रोत्साहन अनुदान दूरच; दागिने कर्जाचे हप्ते भरावे लागत आहेत. अनेक मंत्री अनुदान देणार अशी घोषणा करत आहेत. मात्र या घोषणा केवळ घोषणाच आहेत. त्यामुळे पंधरा महिने उलटूनही शेतकरी प्रोत्साहन अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. बुडव्यांना माफी आणि प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा अशी सरकारची धारणा आहे काय? असा प्रश्न या शेतकर्यांतून होत आहे.
राज्यातील 40 लाख शेतकरी प्रतीक्षेत
नियमित कर्जफेड करणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 18 हजार 189 शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यापैकी 1 लाख 92 हजार शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत. तर इतर बँकांचे 26 हजार 119 शेतकरी आहेत. या शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान न मिळाल्यास या 1464 कोटीवर पाणी पडणार आहे.