कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मसाज सेंटरच्या नावाखाली कावळा नाका परिसरातील हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून अड्डा चालविणार्या महिलेसह भागिदाराला अटक केली. ज्योती मारुती मिसाळ (वय 28, रा. शिरोली पुलाची) व परमेश्वर गणपती सूर्यवंशी (55, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.
संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोन पीडितांची सुटका केली. गजबजलेल्या व मध्यवर्ती परिसरात हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कावळा नाका परिसरात निंबाळकर कॉलनी येथील गुरुकृपा अपार्टमेंटमधील दुसर्या मजल्यावर संशयितांनी भागिदारीमध्ये गुडलक मसाज सेंटर सुरू केले होते.
मात्र, मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यात येत होते. मिळणार्या उत्पन्नातून स्वत:ची उपजीविका करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली. रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ज्योती मिसाळ व परमेश्वर सूर्यवंशी याना अटक करण्यात आली. रॅकेटमध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग असावा का, किती दिवसांपासून हा अड्डा सुरू होता, याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे, असे गवळी यांनी सांगितले.