कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे -पाटील यांना पाठिंब्यासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या साखळी धरणे आंदोलनास सोमवारी आशा व गट प्रवर्तक युनियनने जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक संघ-हुपरी राजारामपुरी विकास मंच सदस्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
मराठा आरक्षणाबाबत प्रशासकीय व राजकीय यंत्रणेची अनास्था व धोरण कर्त्यांच्या दूरद़ृष्टीच्या अभावामुळे आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहिल्याचा आरोप विविध संघटनांनी केला. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षण संदर्भात सामाजिक व शैक्षणिक मागास मराठा दुर्बलांचा उद्रेक झाला आहे. शासनाने चोहोबाजूंनी अभ्यास करून मराठा आरक्षणाची समस्या ताबडतोब सोडवावी, असे आवाहनही यावेळी केले.
आशा व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने दसरा चौकात आल्याने दसरा चौक आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला. आशा वर्कर्सनी आंदोलनास पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून दसरा चौक दणाणून सोडला.
आशा वर्कर यूनियनचे भरमा कांबळे, संदीप सुतार यांच्या नेतृत्वाखाली राजश्री मेढे, रुपाली चौधरी, अंजना बडगर, संगिता पाटील, कविता राणे, रेखा शिंदे, सारिका पाटील, छाया तिरुके, विद्या पाटील, पद्मा परकरे, सचिव- उज्वला पाटील, ज्योती शेंडे, वंदना देशमाने, मंगल ठाणेकर, सुवर्णा लंबे, ज्योती वडर, विद्या कांबळे यांच्यासह सुमारे दीड हजारांवर आशा वर्कर व गट प्रवर्तक आंदोलनात सहभागी झाल्या.
हुपरीच्या ज्येष्ठ सेवा संघातर्फे सुरेश इंग्रोळे, नानासाहेब भोसले, रावसाहेब पाटील, गणपतराव ढोणूक्षे, सुभाष काटकर यांनी सहभाग घेतला. राजारामपुरी विकास मंचतर्फे बाबा लिंग्रस यांच्या नेतृत्वाखाली महेश उत्तुरे, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, दत्ता गायकवाड, योगेश लोंढे, पुष्कर शिंदे, लहू पाटील, नितीन मोरे, सनी शिंदे, सुशिल संकपाळ, अजित वडर, अल्ताफ मकानदार उपस्थित होते.
राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे प्रशांत पोकळे, विनय येवले व प्रताप पवार यांनी पठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सकल मराठा समाजाचे बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई उपस्थित होते.