कोल्हापूर

मदर मिल्क बँकेबाबत जनजागृतीची गरज

Arun Patil

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असते, तरीही काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठ 'ह्युमन मिल्क बँक' म्हणजे 'मातृ दुग्ध पेढी' महत्त्वाची ठरते. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून सीपीआरमध्ये मदर मिल्क बँक सुरू झाली आहे. आता मातांनी दुग्ध दान करावे, यासाठी त्यांचे समुपदेशन आणि जनजागृतीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला पुढाकार घेऊन व्यापक चळवळ उभी करावी लागणार आहे.

'मदर मिल्क बँक' प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिसीन) सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सीपीआरमध्ये अशा प्रकारची बँक व्हावी, अशी मागणी जोर धर होती. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यातून अत्याधुनिक 'मदर मिल्क बँक' येथे उभा राहिली आहे.

या बँकेमुळे दुधासाठी भुकेलेल्या अर्भकांची भूक भागण्यास मदत होणार आहे. प्रसूतीनंतर काही मातांना दूध येत नाही. त्यामुळे नवजात अर्भक दुधापासून वंचित राहते. अशा अर्भकांची दुधाची भूक गायीचे दूध, बेबी फूडद्वारे भागविली जाते. यामुळे बालकांचा बौद्धिकविकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणजे 'मातृ दुग्ध पेढी' होय.

दुग्ध पेढीतील दूध हे अर्भकाच्या आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. निरोगी स्तनदा मातेने दूध दान केल्यानंतर त्या दुधाच्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्याची साठवण करून ठेवली जाते आणि गरजू बाळ, अर्भकांना ते दूध दिले जाते.

जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्यातून सीपीआरमध्ये 'मदर मिल्क बँक' उभी राहिली हे खरे आहे; पण त्यासाठी व्यापक जनजागृती उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हा प्ररिषद, महापालिका आरोग्य विभाग, सीपीआर, खासगी रुग्णालये, सामाजिक संघटना यांनी जनजागृती केल्यास गरजू अर्भक, बालकांची अशा दुधामुळे भूक भागणार आहे.

SCROLL FOR NEXT