उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
कोल्हापूर

मतदारांना धमकावता, हा महाराष्ट्र आहे की बंगाल? : फडणवीस

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी नेते, मंत्री राज्यात दहशत पसरविण्याचे काम करतात. आजपर्यंत राज्यात असे चित्र कधीच नव्हते. मतदारांना धमकावता, हा महाराष्ट्र आहे की बंगाल, असा खडा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
कोल्हापूर उत्तरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही दहशत झुगारून मतदार भाजपला विजयी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तर हा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. भाजपच्या मदतीने या मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. आता शिवसेना, राष्ट्रवादीच्या सोबतीने हा मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे. राजकारणात पॉलिटिकल अ‍ॅरिथमेटिक चालत नाही, तर पॉलिटिकल केमिस्ट्री चालते, असे फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तरमधील पॉलिटिकल केमिस्ट्री पूर्णपणे बदलली आहे. शिवसेनेचा मतदार काँग्रेसला मतदान करेलच, असे राजकीय गणित मांडून चालणार नाही. येथील पॉलिटिकल केमिस्ट्री भाजप व भगव्याच्याच बाजूने आहे, असा दावा त्यांनी केला.

महाआघाडीबद्दल संताप

राज्यात महाविकास आघाडीबद्दल सर्वसामान्यांत संताप आहे. महाविकास आघाडी नेत्यांकडून होणारा भ—ष्टाचार, अनाचार, दुराचाराबद्दल जनतेच्या मनात चीड आहे, असे फडणवीस म्हणाले.

महापुरात हे सरकार लोकांना काही मदत देऊ शकले नाही. 2019 च्या महापुरात युतीच्या सरकारने जशी मदत दिली, तशीच यावेळीही दिली पाहिजे हे पालकमंत्री, मंत्री सरकारला पटवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे जनतेचे नुकसान झाले, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोरोना वाढत असतानाही गोकुळ निवडणुकीसाठी लॉकडाऊन उठविले. त्यामुळे 400 जण मृत्युमुखी पडले हे लोकांनी अनुभवले आहे. निवडणुकीनंतर पुन्हा लॉकडाऊन आले. त्याला विरोध करणार्‍या व्यापार्‍यांना मारहाण झाली, असा आरोप त्यांनी केला. कोल्हापुरातील विकासात महाविकास आघाडी सरकारचे काय योगदान आहे, असा सवालही फडणवीस यांनी केला.

भाजपने टोल घालविला. विमानतळ विस्तारीकरण केले, महामार्ग विकास, पिण्याची पाणी योजना ही कामे केली, असे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्वत:पलीकडे पाहू शकत नाही ही भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपलाच विजय मिळेल. भाजपचे 107 वे आमदार म्हणून सत्यजित कदम विजयी होतील, असा दावा फडणवीस यांनी केला.

पटोलेंना भगव्याचा राग का?

कोणतीही गोष्ट समजून न घेता, न पाहता बोलण्?याची जुनीच सवय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आहे. त्यांना भगव्याचा एवढा राग, तिटकारा का आहे? भगवा म्हटले की त्यांना धर्मांधता दिसते. मग इतर धर्माचे लांगूलचालन ते का करतात? असा सवाल फडणवीस यांनी केला. इतर धर्माच्या लांगूलचालनामुळेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार अडचणीत आले आहेत. भाजपचा श्वास हिंदुत्व आहे. हिंदुत्व व विकास या अजेंड्यावर भाजप तयार झाला आहे, असेही ते म्हणाले.

आमचा विरोध लांगूलचालनास भाजपची पार्टी विथ डिफरन्स ही ओळख कायम आहे. भोंगे चालतात मग हनुमानचालिसा का चालत नाही? हनुमानचालिसा म्हटल्याने काही लोकांना का राग येतो? भोंगे वाजल्याने राग येत नसेल तर हनुमानचालिसाने राग का येतो? असा सवाल फडणवीस यांनी केला. हनुमानचालिसा देशाची परंपरा आहे. शिवसेना विभागप्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असे ते कसे चालते. आमचा कोणत्याही धर्मास विरोध नाही. कोणत्याही प्रार्थनेस विरोध नाही. मात्र लांगूलचालन करण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार बैठकीस आ. चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, हर्षवर्धन पाटील, केशव उपाध्ये, धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, बाबा देसाई उपस्थित होते.

अंबाबाईचा आशीर्वाद भाजपला

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल. काय करायचे हे मतदारांचे ठरलेले आहे. पॉलिटिकल केमिस्ट्रीनुसार शिवसेनेची सर्वच मते भाजपला मिळतील, असा दावा फडणवीस यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT