कोल्हापूर

भोंदू मामा कडून भक्तांची लूट! राजकीय आश्रयामुळे दुकानदारी फोफावली

Arun Patil

कोल्हापूर; दिलीप भिसे : संत बाळूमामांचे माहात्म्य आणि प्रभावाचा फायदा उठवत पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा, विदर्भातही स्वयंघोषित 'मामा' भक्तांची लूट करीत आहेत. आदमापूरच्या संत बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवून भोंदू मामा नी सर्वसामान्य भक्तांच्या भावनांशी खेळ सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात किमान डझनावर 'स्वयंघोषित मामां'नी स्वत:च्या नावांची संस्थाने उभारली आहेत. राजकीय आश्रय, पाठबळामुळे त्यांची दुकानदारी जोमात असल्याचे चित्र आहे. संत पुरुषांच्या नावावर पश्चिम महाराष्ट्रात अनेक कथित मामांनी मठासह शाही दरबार थाटून धुमाकूळ घातला आहे.

एवढा डामडौल, ऐश्वर्य आले कोठून?

संत पुरुषांच्या नावावर दुकानदारी थाटलेल्या कथित भोंदूंच्या हातातील लखलखणार्‍या अंगठ्या, गळ्यात सोन्याचा गोफ, सोनसाखळ्या, अंगावर भरजरी वस्त्रे, वातानुकूलीत आलिशान मोटारींचा ताफा, सेवेला चार-पाच पैलवान गडी… असा त्यांचा डामडौल असतो. दर्शन सोहळ्याचा शाही थाट तर वेगळाच असतो. भोंदू मामांचे हे ऐश्वर्य अन् डामडौल येतो कोठून? याचा तपास करण्याची गरज आहे.

दोनवेळच्या जेवणाची भ्रांत अन् दुसरीकडे शाही मिजास!

सामान्य माणूस रात्रंदिवस राबतो, घाम गाळतो. तरीही त्याला दोनवेळच्या पोटाची भ्रांत असते. दुष्काळी पट्ट्यात शेकडो लोक बेरोजगार झाले. तरुणांची रोजगारीसाठी भटकंती सुरू आहे. असे एकीकडे चित्र असताना, दुसरीकडे भोंदूंचा मात्र राजेशाही थाट कमी झालेला नाही. करणी, भूतबाधा, दुर्धर आजारावर जालीम उपायाचे कारण सांगून भोंदूंनी बाजार मांडल्याची विदारक स्थिती पाहायला मिळत आहे.
भोंदूवर राजकीय वरदहस्त!

भोंदू मामा एका रात्रीत अवतरलेला नाही. त्याचा आदमापूर परिसरात गेल्या काही वर्षांपासून वावर आहे. तालुक्यातील आदमापूरसह वाघापूर, यमगे, कुरुकली आदी गावांतील भक्तांशी त्याने संपर्क वाढवला होता…टी.व्ही.वर मालिका सुरू होताच त्याने उचल खाल्ली… त्याच्या नावाचा जयघोष करण्यासाठी त्याने पगारी भक्त नेमले… अनेक मंडळी कथित मामाच्या मांडीला मांडी लावून बसू लागली… राजकीय मंडळींचा तर त्याच्यावर वरदहस्तच होता.

श्रद्धाळू मंडळी त्याच्या पायावर डोके टेकू लागली. आदमापूरसह पंचक्रोशीतील तरुणांनी कथित मामांविरुद्ध बंड पुकारून आवाज उठविल्यानंतर प्रमुख मंडळींना जाग आली. एकापाठोपाठ निषेधाचे ठराव होऊ लागले… ग्रामस्थ एकवटले अन् भोंदू मामाची दुकानदारी बंद होण्यास सुरुवात झाली.

भोंदू मामापासून सावध राहा : सरपंच विजय गुरव

संत बाळूमामा यांच्या नावाचा जाणीवपूर्वक वापर करून कथित भोंदूने भक्तांच्या असहाय्यतेचा पुरेपूर फायदा उठवला आहे. भविष्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे भोंदू निर्माण होऊ नयेत, अशा प्रवृत्तींपासून भाविकांनी सावध राहावे, असे आवाहन सरपंच विजय गुरव यांनी केले आहे.

प्रशासन यंत्रणा ढिम्मच!

भोंदू बुवाविरुद्ध एक ना अनेक तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनीही आवाज उठवून प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडेही धाव घेण्यात आली आहे; पण शासकीय यंत्रणा पूर्णत: ढिम्म आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडेही ग्रामस्थांनी धाव घेतली आहे. लोहिया यांनी या प्रकरणातील सत्य शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सामान्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT