कोल्हापूर

‘भारत जोडो’तून शाहूंचे विचार देशभर

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जाती-धर्माच्या नावाखाली समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भारतीय राज्यघटना धोक्यात आली आहे. अशा वेळी राजर्षी शाहू छत्रपतींचे समतेचे विचार देशाला तारू शकतात. तोच संदेश राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेच्या माध्यमातून देशभर पोहोचवत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील एक हजार 239 गावांमध्ये एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा दाखविण्याचा आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी झाला. या निमित्ताने दसरा चौकामध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. समतेची भूमी म्हणून ओळख असलेल्या राजर्षी छत्रपती शाहूंच्या नगरीत दलित, वंचित, शोषित आणि पीडित समाजाला सन्मान देण्याचे तसेच समाजाला शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण देण्याची भूमिका राजर्षी शाहू छत्रपतींनी याच भूमीत घेतली. याच भूमिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्याला मजबुती दिली. मात्र आता हेच संविधान धोक्यात आले आहे. केंद्र सरकार समतेचा विचार मोडीत काढून जाती-धर्मात फूट पाडून समाजात
दुही माजविण्याचे काम करत आहे. अशा वातावरणात राजर्षी शाहूंची प्रेरणा घेऊन काँग्रेसने 'नफरत छोडो, भारत जोडो' हा नारा देत 'भारत जोडो' यात्रा सुरू केली. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी समाजाला जोडण्याचे व लोकांशी संवाद साधण्याचे काम करत असल्याचे सिंह यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेस प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी सुरुवातीला राहुल गांधी यांची खिल्ली उडविली. त्यांची पुन्हा बदनामी सुरू केली. मात्र यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून एक महिन्यातच विरोधकांमध्येच परिवर्तन होताना दिसत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे मशिदीत गेले. रामदेव बाबांची सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दलची भाषा बदलली आहे. धर्म व जातीच्या नावावर देश चालत नाही. धर्माच्या नावाखाली आजपर्यंत कोणत्याही देशाची प्रगती झालेली नाही. असे असताना धर्माच्या नावाखाली भाजप जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या आधारे समाज तोडण्याचे काम करत आहे. भारतात विविधेत एकता आहे. त्यामुळे या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम या यात्रेच्या निमित्ताने सुरू असल्याचे सिंह म्हणाले.

भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली अश्वासने गेल्या आठ वर्षांत पूर्ण केलेली नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली परंतु त्यांच्या काळात आठ कोटी रोजगार घटले. मोजक्या उद्योगपतींची कोटीची कर्जे माफ केली. मात्र शेतकर्‍यांना काहीच दिले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यवाहांनी रोजगार घटत असल्याचे, गरीब अधिक गरीब होत असल्याचे, श्रीमंत अधिक श्रीमंत असल्याचे म्हटले आहे. त्याकडे तरी लक्ष द्या, असे आवाहन सिंह यांनी केले.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बदलास सुरुवात : पाटील

राहुल गांधी हे मते मागण्यासाठी नव्हे तर देश जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा करीत आहेत. लोकांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी रोज 25 ते 30 कि.मी. पायी प्रवास करीत आहेत. या वेळी ते समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. हे चित्र गावागावात पोहोचण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सतेज पाटील यांनी साकारलेला हा प्रयत्न राज्यात इतरत्र राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आठ वर्षांत विविध घोषणा केल्या. मात्र गरिबांना काहीच दिले नाही. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाचा राजकीय इतिहास बदलेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. सुरुवातीला यात्रेवर भाजपने टीका केली. परंतु नंतर सोशल मीडियावर भाजपवरच टीकास्त्र सोडण्यात येऊ लागल्याने त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे सांगून बाळासाहेब थोरात यांनी यात्रेशी एवढे लोक जोडले जात आहेत की अभूतपूर्व चळवळ असेल, असा विश्वास व्यक्त केला.

समाजा-समाजातील दुही मिटविण्याचे काम केवळ काँग्रेसच करू शकते, असा विश्वास आ. पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील सर्व गावांसह इचलकरंजी शहर आणि 13 नगरपालिका क्षेत्रांत एलईडी स्क्रीनद्वारे भारत जोडो यात्रा दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले. शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी मोहन जोशी, अभय छाजेड, अमृता सिंह, आ. ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे, आ. जयश्री जाधव, माजी आ. दिनकरराव जाधव, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील, गणपतराव पाटील, गुलाबराव घोरपडे, राहुल पाटील, गोपाळराव पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT